७. अांतरराष्ट्रीय वाररेषा

भौगोलिक स्पष्टीकरण

पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा अाणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोईसाठी कालमापन पद्धती तयार केल्या. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळी तयार केली. त्या वृत्तजाळीतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी यांची सांगड घातली, म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास २४ तास लागतात. (पृथ्वीला ३६०° तून स्वतःभोवती फिरण्यास २४ तास लागतात.)

पृथ्वी परिवलन करतेवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमी पुढे असते. हे लक्षात घेऊन सुनीलच्या प्रवासाचा विचार करू. सुनील पूर्वेकडे जात आहे, त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तांवर वेळ पुढे पुढे गेलेली असेल. उदा., ९०°पूर्व रेखावृत्तावर गुरुवार संध्याकाळचे ६ वाजले असतील. सुनील तसाच पूर्वेकडे पुढे जात राहिल्यास १८०° रेखावृत्तावर सुनीलच्या मते गुरुवारचे रात्रीचे १२ वाजले असतील. त्याचा प्रवास पुढे चालू राहिल्यास त्याच्या मते १८०° रेखावृत्तानंतर शुक्रवार सुरू होईल. ९०° पश्चिम रेखावृत्तावर त्याचवेळी शुक्रवार सकाळचे ६ वाजले असतील, तर पृथ्वीप्रदक्षिणेनंतर सुनील ग्रीनिच रेखावृत्तावर मीनलला भेटेल, तेव्हा शुक्रवारची मध्यान्ह झालेली असेल.

आता मीनलच्या प्रवासाचा विचार करता, ती वेगवेगळ्या रेखावृत्तांवरून जसजशी पश्चिमेकडे जाईल, तसतशी त्या त्या रेखावृत्तावरील वेळ मागे होत असल्याचे जाणवेल. उदा., ३०° पश्चिम या रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे १० वाजले असतील, तर ६०° पश्चिम रेखावृत्तावर त्याचवेळी गुरुवार सकाळचे ८ वाजले असतील. त्याचवेळी १८०° रेखावृत्तावर रात्रीचे १२ वाजले असतील. मीनल तशीच पुढे गेली, तर ९०° पूर्व रेखावृत्तावर त्याचवेळी बुधवार संध्याकाळचे ६ वाजलेले असतील. जेव्हा ती पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा ग्रीनिच रेखावृत्तावर येईल, तेव्हा तिच्या मते त्या वेळी बुधवारची मध्यान्ह झालेली असेल.

मीनल आणि सुनील यांच्यात पुन्हा भेटल्यावर वाद होतो, कारण मीनलच्या मते ग्रीनिच रेखावृत्तावर बुधवारची मध्यान्हाची वेळ आहे, तर सुनीलच्या मते ती शुक्रवारची मध्यान्हाची वेळ आहे. मग गुरुवार कुठे गेला, असा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या गोंधळावर खालीलप्रमाणे उपाय काढण्यात आला.

वारांच्या गाेंधळावरील उपाय :

१८०° रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर १८०° रेखावृत्त १२ तासांच्या फरकाने येते, त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात (आणि शेवटही) १८०°रेखावृत्तावर होते, म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना खालील बाबी विचारात घेतल्या गेल्या.

(१) प्रवासाची दिशा.

 (२) चालू असलेला वार व दिनांक.

 जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना आहे तोच दिवस व तीच तारीख ग्राह्य धरावी लागते, म्हणजेच गुरुवार २५ डिसेंबर असेल, तर गुरुवार २५ डिसेंबरच धरावा लागतो.

या उलट अमेरिकेडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना वार व तारीख एक दिवसाने पुढे न्यावी लागते, म्हणजेच गुरुवार २५ डिसेंबर असेल, तर शुक्रवार २६ डिसेंबर ग्राह्य धरावा लागतो. आकृती ७.२ व खालील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल.

श्यामराव जपानहून (आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून) १ तारखेला सोमवारी दुपारी १३ वाजता अमेरिकेला (आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे) जाण्यासाठी निघाले. ते २४ तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता, तेथे सोमवार, १ तारखेचे १३ वाजले होते. l श्यामराव ५ तारखेला शुक्रवारी दुपारी १२ वाजता अमेरिकेहून (पूर्वेकडून) जपानला (पश्चिमेकडे) निघाले. ते २४ तासांचा विमानप्रवास करून जपानला पोहोचले, तेव्हा तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता, तेथे शनिवार, ६ तारखेचे दुपारचे १२ वाजले होते.

आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते, की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो, तर पूर्वेला संपतो.

१८०° रेखावृत्तावर बरोबर रात्री १२ वाजण्याच्या क्षणी एकच वार असतो. तेथून पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने, चिली इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा क्षण असतो, तर तेथून पश्चिमेकडील म्हणजेच जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार सुरू होत असतो.

आंतरराष्ट्रीय वाररेषा :

आपला २४ तासांचा दिवस हा मध्यरात्री १२ वाजता सुरू होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होते.

पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणते ना कोणते ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात सर्वांत अगोदर कोठे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी सन १८८४ मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्त्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस असलेल्या १८०° रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा अांतरराष्ट्रीय संकेत आहे.

आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्तासारखी सरळ नाही. काही ठिकाणी ती १८०° रेखावृत्ताच्या पूर्वेला, तर काही ठिकाणी ती पश्चिमेला वळलेली आहे. आकृती ७.२ पहा. आंतरराष्ट्रीय वाररेषेत काळानुसार अनेक वेळा बदल करण्यात आले. शेवटचा बदल २०११ साली केला गेला. आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग १८०° रेखावृत्तावरून गेलेला आहे.

आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व :

आंतरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते.