७. आपणच सोडवू आपले प्रश्न

सार्वजनिक समस्या
आपल्या समूहजीवनात विविध समस्या असतात. या समस्यांमुळे आपली गैरसोय होते. कधीकधी आपले समूहजीवन विस्कळीत होते. समस्यांकडे डोळेझाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात, म्हणून वेळच्यावेळी समस्यांचे निराकरण करावे. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल. परिसरातील समस्या ओळखणे, हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही. त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात.
तंटा निवारण
आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे हीसुद्धा एक समस्या होऊ शकते. सतत होणाऱ्या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते. एकोपा राहत नाही. गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. तंट्याचे स्वरूप गंभीर नसले; तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात; परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत, तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते.

समस्या निवारण
समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हांला माहीत आहेत का ?
हिवरे बाजार : अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या लहान गावात पाण्याची मोठी समस्या होती. त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला. आज हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवागर्द आहे.

  • अनेक गावांत पाण्याची टंचाई असते. त्याची कारणे शोधा व उपाय सुचवा.

श्रमदानातून ग्रामसफाई :  उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची, हे गावकऱ्यांनी ठरवले. त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले. उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळखत तयार केले. प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले.
संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही, असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत. स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देत.
राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले आहे –

‘मिळोनी करावी ग्रामसफाई ।

नाली, मोरी ठायीठायी ।

हस्ते परहस्ते साफ सर्वहि ।

चहूकडे मार्ग ।’

  • वर्तमानपत्रांत श्रमदानाच्या अनेक बातम्या येतात, त्यांचे संकलन करा. श्रमदानातून काय काय साध्य होते याची चर्चा करा.

     शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे. समाजातील शोषण थांबले पाहिजे. विषमता कमी झाली पाहिजे. सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. शांततेचे महत्त्व समजावून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे या मार्गांनी आपण कुटुंबात, शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो.