७. खेळ आणि इतिहास

मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ.

खेळांचा इतिहास हा माणसांएवढाच जुना आहे कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसाच तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्‌धिबळ यांचे उल्लेख येतात.

माहीत आहे का तुम्हांला?

वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील ‘स्वर्णिम गुजरात स्पोर्टस विद्यापीठ’, गांधीनगर, कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.

माहीत आहे का तुम्हांला?

खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.

७.१ खेळांचे महत्त्व

खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळांमध्ये आहे. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो. शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो.

७.२ खेळांचे प्रकार

खेळांचे बैठे आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत.

बैठे खेळ : बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ. उदा., बुद्‌धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात. सागरगोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात. भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकत. विशेषतः बाहुला-बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असे.

मैदानी खेळ : मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत. देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो-खो इत्यादी खेळांचा समावेश होतो. मुला-मुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत.

माहीत आहे का तुम्हांला?

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या : ‘‘बाईसाहेबांस शरीराचा शोक फार होता. पहाटेस उठोन मल्लखांबासी जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून चार घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे.’’

विदेशी मैदानी खेळांत बॅडमिंटन, टेबल टेनिस तसेच हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळांमध्ये धावण्याच्या शर्यती जगभर लोकप्रिय आहेत. यात १०० मीटर, २०० मीटर, मॅरेथॉन आणि अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो.

 

 

शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी व उंच उडी, पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो, नौकानयन तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स इत्यादींचा समावेश होतो.

माहीत आहे का तुम्हांला?

श्रीमती मनिषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तरपेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांची आहे. बाळंभटदादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडांवरील क्रीडा पाहून स्फुरला असेही त्यांनी नमूद केले आहे.

साहसी खेळ – स्केटिंग आणि स्किइंग (घसरण्याच्या शर्यती), आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत. साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तरारोहण, ग्लायडिंग, मोटारसायकल, मोटार कार यांच्या शर्यतींचा समावेश होतो.

चला शोधूयात.

शिक्षक, पालक आणि आंतरजालाच्या मदतीने कुस्तीगीर खाशाबा जाधव, मारुती माने, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवा.

खेळांच्या स्पर्धा : खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे. ऑलिंपिक, एशियाड, दिव्यांगांचे ऑलिंपिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, हॉकी, कुस्ती, बुद्‌धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात. आपल्या देशात हॉकी, क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळांच्या स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते.

माहीत आहे का तुम्हांला?

मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडादिवस’ म्हणून पाळला जातो. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या सन्मानाने विभूषित करण्यात आले.

७.३ खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण

विसाव्या-एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे. ऑलिंपिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विंबल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात. उदा., क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला. या जगभरच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात. प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात. कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्यांकडे बघतात. प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात.

७.४ खेळांचे साहित्य आणि खेळणी

लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधने व उपकरणे असतात, त्यांना खेळणी म्हणतात. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत.

प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे. शुद्रकाच्या एका नाटकाचे नाव मृच्छकटीक असे आहे. मृच्छकटीक म्हणजे मातीची गाडी.

माहीत आहे का तुम्हांला?

कथासरित्सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहेत.

७.५ खेळणी आणि इतिहास

 खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे.

इटलीतील पाँपेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधांबद्दल अनुमान करता येते. अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्परसंबंधांवर प्रकाश टाकू शकतात.

७.६ खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट

 खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळांशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले ‘षट्कार’ नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये ‘खेळ’ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत.

अलीकडच्या काळात ‘खेळ’ आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदा., मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिंपिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत.

चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत वा वर्तमानपत किंवा अन्य ठिकाणी ‘क्रीडा’ या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते.

७.७ खेळ आणि व्यावसायिक संधी

खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना ‘क्रीडा’ क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलिंपिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन, समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते.

खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो.

दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्‌धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते. विविध वाहिन्यांमुळे या खेळांसंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या २४ तास सुरू असतात. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर काम करण्याची संधी मिळते. सरकारी आणि खासगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

माहीत आहे का तुम्हांला?

क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे अाणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे.