७. गवताचे पाते

बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. िवज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यांपैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय.

रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थक्षणोक्षणी अंशत: कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच.

हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.

पट…पट…पट…

त्यांचा तो पट…पट…असा कर्णकटू आवाज…

तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, ‘‘पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की!’’ पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, ‘‘अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय! जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही!’’ हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.

ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले-झोपू लागले. पण पुन:पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती…पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!

ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, ‘काय ही हिवाळ्यातली पानं! जीव खाऊन टाकला यांनी अगदी! केवढा हा कर्णकटू आवाज…छी छी छी! माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी!’

रूपक कथेचा भावार्थ –

अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टींतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्यया कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे; पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते.

 मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय?

 …आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते! बाह्य स्वरूप कितीही बदलले, तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते अाणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वत:ला कल्पून त्याचे सुखदु:ख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली, तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का?