७. दुपार (भाग – २)

सकाळच्या उल्हासानंतर अन्प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशू, पक्षी, झाडे, वेली. सूर्यदिवसाच्या मध्यान्हावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार. त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत. ‘माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर डोळे जाळून टाकीन’, असं त्या सूर्याचं रौद्र रूप, सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच. आपल्या कर्तृत्वानं त्यानं दीपवून टाकलेलं असतं पृथ्वीला-इतकं, की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये.

अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपत्या सूला र्यासाक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत  विसावलेला असतो कोणी शेतकरी.

 सकाळपासून नांगरून अन्घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकरतुकडा, तिच्याच बरोबर दोन-चार सुख-दु:खाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती. दुपार कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षीदेखील थोडीशीच; पण छानशी डुलकी काढत असतात. लांबवर भटकणारे, शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षीदेखील मिळेल त्या वृक्षांवर थोडी विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दाणा-पाणी मिळाल्यावर छोटे-छोटे पक्षीदेखील कुठे तरी विसावत असतात अन्घरांच्या आश्रयानं राहणारी कबुतरंदेखील गुटर्रगूं थांबवून कुठं तरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावलेली असतात. ‘आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या’ म्हणत असते पशु-पक्षी अन्प्राण्यांनादेखील ही दुपार. जंगलातले प्राणीदेखील भक्ष्य मिळवण्यासाठीची भटकंती आता बंद करून, नाही तर सकाळी-सकाळीच ताव मारलेलं आपलं भक्ष्य आता पचवण्यासाठीची पायपीट बंद करून एखाद्या ढोलीत, नाही तर गुहेत अंमळ पाय ताणून विसावलेले असतात. जगाची सगळी काळजी अन्उद्याची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारवर टाकून दिलेली असते-दुपारनंही ही काळजी घेतलेली असते अन् ‘छान आराम करा’ म्हणत असते ती त्यांना!

खेडोपाडी गावं सुस्तावलेली असतात, शेतावर न गेलेल्या घरातल्या बायका सगळी घरकामं करून ‘दोन घटका जरा डोळं मिटूया’- म्हणून विसावलेल्या असतात अन् घराच्या दरवाजावर टांगलेल्या पिंजऱ्यातला पोपटदेखील छानपैकी पेंगत असताे. या सगळ्यांची काही क्षणांची विश्रांती असते दुपार; परत ताजतवानं होण्याकरिता कार्यरत असते ती!

दुपार होते एखाद्या शहरात, नाही तर महानगरीत. काबाडकष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली; पण एखादी आणखी चांगली वर्दी ‘येईल का?’- या विवंचनेत थोडा पहुडलेला असतो अन्कोणी शेठ तेवढ्यात त्याला ‘ऊठ रे’ करून उठवतोही. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते, त्यानेही फारशी घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते आणि तो कपाळावर उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला, दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. नागपूरच्या नाही तर अमरावतीच्या, नाही तर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात, जरा कुठं डुलकी काढू-विसावू म्हणणाऱ्या सायकलरिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते अन्घाम पुसत निघतात बिचारे रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरिता भर दुपारी सायकल मारत. दुपार सलाम करते या गाडीवानांना अन् ही सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्याला!

कोणत्याशा कारखान्यात पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हात धुऊन हातातला रिकामा डबा सावरत लोकल नाही तर बस पकडण्यासाठी, डोळ्यांवर आलेली झापड दूर सारण्याचा प्रयत्न करत धावत-पळत घराच्या आेढीने निघालेले असतात हे श्रमिक अन्त्याच वेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम करण्याकरिता आलेले असतात त्यांचे साथीदार. धडधडणारं ते अवाढव्य मशीन थांबवायचं नसतं अन्ही सगळी कार्यशीलता कौतुकानं पाहत असते दुपार अन्कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देत असते त्यांना!

मधल्या सुट्टीत वर्गातून आरडत-ओरडत धूम ठोकणाऱ्या पोरांना कोण आनंद झालेला असतो, या छोट्याशा सुटीचा अन्आईनं काय डब्यात दिलंय याची उत्सुकता तर आता अगदी शिगेला पोहोचलेली असते. नेमका आज त्यांचा आवडता डबा असतो अन्तो पटापट खाऊन, हात धुवून वर्गसुरू व्हायच्या राहिलेल्या थोड्या वेळात त्यांनी थोडा खेळ आणि मस्तीही केलेली असते. दुपार मोठ्या गमतीनं रोज-रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते.

शहरातल्या निरनिराळ्या कार्यालयांतल्या लेखनिकांचे अन्हिशोबतपासनिसांचे लक्ष हातांतल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलेले असते-केव्हाचे दीड-दोन होतायत. पोटात भुका लागल्यायत. आता एवढ्यात काही नवं काम समोर न येवो म्हणजे डबा खाता येईल थोडा निवांतपणे, असा विचार येतयेतच जेवायची सुट्टी होते. संगणक काही मिनिटांकरिता बंद होतात अन्सहकाऱ्यांशी जिवाभावाच्या गप्पा मारत सुख-दु:ख ‘शेअर’ करत करत ताजेतवाने होण्याकरिता, पोटाला आधार देण्यासाठी एकमेकांच्या डब्यांतल्या पदार्थांचीही थोडीशी चव चाखत एखादं कार्यालय काही मिनिटांकरिता कसं शांत-शांत झालेलं असतं. जेवणाची सुट्टी संपते. संगणक सुरू होतात. दुपार म्हणते, ‘उठा-आराम बास’ अन्पेनं सरसावत, नाही तर संगणकाचा की-बोर्डसमोर ओढून घेत असतात…हेही आधुनिक श्रमजीवीच! कार्यालयात काम करता-करता, ‘हळूच खुर्चीतच थोडीशी डुलकी काढू’ या विचारानं कोणी डुलकी काढतोही आणि दुपार हसत हसत त्यालाही थोडं माफ करून टाकते. काही क्षणांनी हलकेच उठवते त्याला अन्मग तो करू लागतो अधिक जोमानं टेबलावरचं त्याचं काम!

दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावरही दुपार झालेली असते. मैलोगणती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं-डोळे दीपवून टाकत असतं भर दुपारी अन्दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला. गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन 27 आकाशाकडे झेपावतं अन्मग दुपार सुखावते हे दृश्य पाहून! सृष्टीचं हे चक्र असंच अव्याहत चालू असतं अन् त्यातली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते दुपार!

कर्त्या घरातली कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर-म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वानं चार पैसे आपल्यासाठी अन्पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात…त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो अन्आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या चाळीस-पन्नास वर्षांच्या काळात, आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायची असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरांतली वृद्ध माणसं बिछान्यावर पडून वामकुक्षी करता-करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. त्या दुपारच्या शांततेत आपण कमावल्याच्या-गमावल्याच्या बाबींची मनात कुठे तरी पहुडल्या-पहुडल्या उजळणी चालू असते. कुठे-तरी भीतीची एखादी लकेरही मनात येऊन जाते-भविष्याबद्दल; पण मग ‘रोज राेज हा विचार करायची तरी काय गरज? उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही, याचाही नको करायला विचार…जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे, आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी!’ असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या-भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते

हिमालयातली, नाही तर दूर कुठे तरी आल्प्सच्या पर्वताची बर्फाच्छादित गिरिशिखरं तेजानं न्हाऊन निघतात. दुपारच्या काहिलीनं सुरू होते विघटन… एक निराळंच काम दुपार करत असते. समुद्राच्या पाण्याची वाफ अन्आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी-जणू दुपारच्या रौद्ररूपानं अचंबित होऊन डौलदार गिरिशिखरं धापाच टाकू लागतात अन्प्रसवू लागतो तो डोंगरमाथ्यावरून थेंबाथेंबाच्या रूपाने खाली धरतीकडे. सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याचा मग ओहोळ, ओहोळातून पुढे नदीला मिळते ते पाणी अन् पावसाचा थेंबही न पाडता ही जादूगार दुपार दुथडी भरून धावायला लावते त्या नदीला. शेतकरी सुखावतो. गहू नाही तर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो. दुपारनं आपलं काम चोख बजावलेलं असतं.

‘हे दुपार, तू कर्तृत्ववान आहेस-कार्याची-कामाची प्रेरणा देणारी आहेस-सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस-आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपवून टाकणारी आहेस. दुपार, तू मानवाची हितकर्ती आहेस-रक्षणकर्ती आहेस. आपल्या तेजानं तू नाश करतेस, हवेतले कीटक नि जंतू अन्स्वच्छ करून टाकतेस आसमंत. तू उदास नाहीस तर उल्हास आहेस, तू अचेतन नाहीस तर चेतना आहेस, सकाळनंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्ववाहिनी आहेस…सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे. उत्साहानं कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी, ‘संध्याकाळ चांगली जावी’ म्हणून झटायला लावणारी, तेजाने अशुभ-अमंगल-किडीचा नाश करणारी तू! तुला शतश: प्रणाम…शतश: प्रणाम!’