७. १ निवारा
७. २ हंगामी तळ
७. ३ गाव वसाहती
७. १ निवारा
पाचव्या पाठात आपण पाहिले, की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होते. त्या वेळी युरोपमध्ये गोठवून टाकण्याइतके अतिशीत हवामान होते. शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले. परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे. त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले. जिथे गरज होती, तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या.
७. २ हंगामी तळ मध्याश्मयुगीन
काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली होती. मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होता.
फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल, यांमुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथसारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला होता. आता त्याचा रानडुक्कर, हरीण, डोंगरी होता. शेळी, मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता.
बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करू शकत होते. बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते. त्या त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, फळे-कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते. मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते. कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते. अशा कारणांमुळे ते एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत. रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत.
७.३ गाव वसाहती
नवाश्मयुगातील माणसाची जीवनपद्धती पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळांतील जीवनपद्धतींपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शिकार आणि फळे-कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते; परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय, शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या. या नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात समजावून घेऊ.