७. पोषण आणि आहार

सजीव अन्न व पाणी घेऊन त्यांचा विविध कामांसाठी उपयोग करतात.

 • ऊर्जा मिळवणे • शरीराची वाढ होणे
 • शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे • आजारांचा प्रतिकार करणे.

पोषकतत्त्वे आणि अन्नपदार्थ

कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषकतत्त्वांचे मुख्य प्रकार आहेत. आपण खातो त्या विविध अन्नपदार्थांमध्ये ही पोषकतत्त्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. त्यांपैकी काहींची अधिक माहिती घेऊया.

ऊर्जादायी पोषकतत्त्वे – कर्बोदके

आपली मुख्य गरज ऊर्जेची असते. ती कर्बोदकांमुळे भागते. त्यामुळे आपल्या आहारात भात, पोळ्या, भाकरी अशा पदार्थांचा प्रामुख्याने समावेश असतो, म्हणून जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी तृणधान्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत.

सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर सर्व कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला ‘पोषण’ म्हणतात आणि या कामांसाठी उपयोगी पडणाऱ्या अन्नघटकांना ‘पोषकतत्त्वे’ म्हणतात.

स्निग्ध पदार्थ

तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थापासूनही आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागते.

आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांपासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. उष्णता मोजण्यासाठी ‘किलोकॅलरी’ या एककाचा उपयोग होतो, म्हणून अन्नपदार्थांपासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठीही किलोकॅलरी हे एकक वापरले जाते. वाढत्या वयातील मुला-मुलींना रोज साधारणपणे २०००-२५०० किलोकॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते.

प्रथिने

वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असलेली प्रथिने, कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी अशा अन्नपदार्थांपासून मिळतात.

खनिजे व जीवनसत्त्वे

रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक खनिजे, जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. ते आपल्याला प्रामुख्याने भाज्या व फळांपासून मिळतात.

खनिजे व जीवनसत्त्वे यांची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्याविषयी अधिक माहिती घेऊया.

शरीराला अनेक असेंद्रीय पदार्थांची गरज असते त्यांना खनिजे म्हणतात. खालील तक्त्यात अन्नातून मिळणाऱ्या काही खनिजांची उदाहरणे दिली आहेत. त्याचबरोबर या खनिजांचे कार्य, त्यांचे अन्नातील स्रोत, तसेच शरीरात त्यांची कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात याविषयीची माहिती खालील तक्त्यातून घेऊया.

असे होऊन गेले

कॅसिमीर फंक हे युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक. बेरीबेरी हा विकार ‘सडलेला’ ( शितांवरचे आवरण काढलेला) तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते, असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखात वाचले.

ज्या पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. त्याला त्यांनी जीवनसत्त्व (व्हिटॅमिन ) हे नाव दिले. स्कर्व्हीं, पेलॅग्रा, मुडदूस हे विकारही विविध जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनीच मांडले.

प्रोबायॉटिक

दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव दह्यात, ताकात असतात हे तुम्हांला माहीत आहे. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना ‘प्रोबायॉटिक’ म्हणतात.

अनेक प्रकारचे प्रोबायॅटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यात राहत असतात. ते पुरेशा संख्येने तेथे राहणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असते. म्हणून दही, ताक असे ‘प्रोबायॉटिक’ अन्नपदार्थ अधून मधून घेत राहणे महत्त्वाचे असते.

जुलाब, उलट्या झाल्या, की आतड्यातील पाण्याबरोबर सूक्ष्मजीवही बाहेर टाकले जातात. काही औषधांमुळेही ते नष्ट होतात. मग त्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी अधिकचे ताक, दही घ्यायला हवे.

संतुलित आहार

आपण दिवसभरात जे अन्नपदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे ‘आहार’ म्हणतात.

सर्व पोषकतत्त्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात.

निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषकतत्त्वांचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. संतुलित आहार मिळाल्यास :

 • काम करण्याची क्षमता वाढते.
 • शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.
 • आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
 • शरीराची चांगली वाढ होते.

संतुलित आहार कसा मिळवावा?

आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे, याची खात्री करण्यासाठी अन्न पिरॅमिड तयार करतात. आपण खातो त्या अन्नपदार्थांची विविध गटांत विभागणी करतात. आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटांतील अन्नपदार्थांचा किती प्रमाणात समावेश असावा, त्या प्रमाणात त्यांना एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागा देतात. प्रत्येक गटांतील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून ठरवता येते.

पृष्ठ क्रमांक ५३ वरील पिरॅमिडप्रमाणे प्रत्येक गटांतील काही अन्नपदार्थ रोज आलटून- पालटून योग्य प्रमाणात निवडल्यास आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करता येते.

तंतुमय पदार्थ पिरॅमिडप्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास त्यांत भाज्या, फळे, तृणधान्ये, कडधान्ये यांचा समावेश होतो. त्यांतून तंतुमय पदार्थही पुरेशा प्रमाणात मिळतात.

आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत, तर काय त्रास होऊ शकतो? आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? पाणी

वरील सर्व पोषकतत्त्वांबरोबर शरीराला पाण्याचीही सतत गरज भासते. त्यासाठी दूध, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणीही प्यावे.

कुपोषण

शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला ‘कुपोषण’ म्हणतात. पुरेसे अन्न न मिळाल्याने किंवा आहार असंतुलित असल्यामुळे कुपोषण होते. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषण होते

जंक फूड (Junk food)

चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, तयार शीतपेये, आकर्षक वेष्टनातील (packaged) अन्नपदार्थ तसेच बाजारातील तळलेले अन्नपदार्थ जसे वडा, भजी इत्यादी खूप चविष्ट लागतात, म्हणून असे पदार्थ आपल्याला आवडतात, परंतु या पदार्थांत मैदा, तेल, साखर जास्त प्रमाणात असतात. गव्हापासून मैदा किंवा उसापासून साखर बनवताना गव्हामध्ये व उसामध्ये असलेली अनेक पोषकतत्त्वे निघून जातात. त्यामुळे त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आणि आपली भूक भागते.

साहजिकच, जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्नगटांतील पदार्थ कमी मिळतात. असे वरचेवर झाल्यास आपल्या शरीराला लवकरच प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे या पोषकतत्त्वांची कमतरता भासू लागते, त्याचा परिणाम कुपोषणात होतो.

हे पदार्थ सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणा येतो. त्याचाही तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतो. अशा पदार्थांतून आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे मिळत नसल्यामुळे त्यांना ‘जंक फूड’ म्हटले जाते.

लठ्ठपणा कसा टाळावा ?

 • संतुलित आहार घ्यावा.
 • धान्ये, भाज्या, फळे सालींसकट खावीत.
 • सायकलचा अधिक वापर करावा. मैदानी खेळ जास्त खेळावे.

                           x

 • भूक नसताना खाऊ नये. जेवताना टीव्ही पाहू नये.
 • छोट्या अंतरांसाठी मोटारगाड्या वापरू नयेत.
 • पॅकेटबंद तयार अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे.

अन्नपदार्थांतील भेसळ

अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो. त्याला ‘अन्नाची भेसळ’ म्हणतात. अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातकही असू शकतात. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य असतात.

भेसळीचे पदार्थ

भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ, अन्नपदार्थांत बेमालूमपणे मिसळून जातील असे असतात.