माझी भाषा माझी आई
अर्थ भावनांना देई,
तिच्या राहावे ऋणात
होऊ नये उतराई.
तिच्या एकेका शब्दाला
रत्न-कांचनाचे मोल,
कधी तप्त लोहापरी
कधी चांदणे शीतल.
रानवाऱ्याच्या गंधात
माझी मराठी भिजली,
लेऊनिया नाना बोली
माझी मराठी सजली.
माझ्या भाषेचे अमृत
प्राशेल तो भाग्यवंत,
तिचा नाही दुजाभाव
असो कोणताही पंथ.
माझ्या मराठी भाषेची
काय वर्णावी थोरवी,
दूर देशी ऐकू येते
माझ्या मराठीची ओवी.