७. मानवी वस्ती

भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे :

भौगोलिक स्पष्टीकरण

भारतात हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार व सुपीकता यांमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्वकिनारपट्टी, नर्मदेचे खाेरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात. याउलट मध्य भारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंचसखल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात.

ब्राझीलमधील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे :

भौगोलिक स्पष्टीकरण

ब्राझीलमध्ये सुरुवातीच्या वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात झाल्या. आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत. या वस्त्यांच्या विकासाची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक पाणी पुरवठा, साधनसंपत्तीची उपलब्धता, शेतीपूरक जमीन इत्यादींमुळे या भागात जमीन जरी कमी असली तरीही दाट वस्ती आढळते. उदा., सावो पावलो सावो पावलोचा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे.

कॉफीच्या उत्पादनासाठी हा प्रदेश सुयोग्य आहे. या प्रदेशात खनिजाचा मुबलक साठा आहे. या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो. येथे वाहतुकीच्या सोईही चांगल्या विकसित झाल्या आहेत. वरील सर्व कारणांमुळे सावो पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. आकृती ७.३ पहा.

ब्राझीलच्या ईशान्य भागातील उच्चभूमीचा प्रदेश अवर्षणग्रस्त असल्याने या भागात शेतीचा विकास मर्यादित झाला आहे. या भागात ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आहेत. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. त्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

l प्रदेश घनदाट विषुववृत्तीय वनाने व्यापलेला आहे. आकृती ७.४ पहा.

l हवामान रोगट असून मानवी वस्तीस अनुकूल नाही.

l साधनसंपत्तीचा शोध व वापर यांवर निसर्गत:च मर्यादा आहेत.

l या भागात वाहतुकीच्या सोई अतिशय मर्यादित स्वरूपात विकसित झालेल्या आहेत.

भारत-नागरीकरण :

एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरांत राहतात, त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरवता येते.

भौगोलिक स्पष्टीकरण

आलेखावरून असे स्पष्ट होते, की भारतातील नागरीकरणाचा वेग कमी आहे. भारतातील नागरीकरणाचा कल २०११ साली ३१.२% होता. तो विकसित देशांच्या तुलनेत फारच कमी होता. असे असले तरी देशातील नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे. नागरीकरणांसाठी उदयास आलेली नवीन शहरे, त्यांचा वाढता विस्तार, त्या शहरांबाबतचेनियोजन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत.

भारतातील नागरीकरणाची परिस्थिती पाहता उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण जास्त झालेले आढळते. गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. या राज्यातील सुमारे ६२% लोकसंख्या शहरी भागांत राहते. दिल्ली

केंद्रशासित प्रदेशाचे नागरीकरण ८०% च्या वर झालेले आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ या राज्यांत नागरीकरण अधिक झाले आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थान या राज्यांत नागरीकरण कमी झालेले आढळते.

ब्राझील नागरीकरण :

भौगोलिक स्पष्टीकरण

विकसनशील देशांपैकी ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला एक देश आहे. या देशाच्या नागरीकरणाची प्रक्रिया वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्राझीलची सुमारे ८६% लोकसंख्या शहरी भागांत राहते. १९६० ते २००० या चार दशकांत नागरीकरणाचा वेग जास्त होता; परंतु त्यानंतर मात्र ब्राझीलमधील नागरीकरणाचा वेग मंदावला आहे. ब्राझीलमधील प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागांत ‘सावो पावलो’ या महानगरात आणि औद्योगिक प्रदेशात नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे. देशातील फक्त काही भागांतच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचेहोणारे केंद्रीकरण लक्षात घेऊन ब्राझील सरकारने ‘पश्चिमेकडे चला’ या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे काही भागांतच होणारे नागरीकरण कमी होऊन लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल आणि देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोल कमी होईल.

नकाशावरून असेदिसून येते, की देशातील नागरीकरण अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात जास्त झाले आहे. उत्तरेकडील राज्यांपेक्षा सावो पावलो, गोइआस, रिओ दी जनेरीओ या राज्यांत नागरी लोकसंख्या जास्त आहे. ब्राझीलमधील उच्चभूमी प्रदेश व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी असल्याने या प्रदेशात नागरीकरण कमी आहे. या भागात मॅनाॅस हेनिग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. या ठिकाणी नागरीकरण जास्त झालेले आढळते.