भौगोलिक स्पष्टीकरण
वरील कृतीतून तुम्ही शाळेतील विद्यार्थी संख्येसंदर्भातील माहिती मिळवलीत. अशाच प्रकारे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश व जागतिक पातळीवरील लोकसंख्येची माहिती आपण मिळवू शकतो. ही माहिती मिळवताना वय व लिंग संरचना, साक्षरता इत्यादींचा विचार करावा लागतो. एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक उपयुक्त असतात. त्यांतील लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना खालील मुद्देविचारात घ्यावे लागतात.
l लोकसंख्येची वाढ l लोकसंख्येचे वितरण
l लोकसंख्येची घनता l लोकसंख्येची रचना
लोकसंख्या वाढ :
वरील कृतीतून असे लक्षात येते, की प्रदेशाच्या लोकसंख्येत सतत बदल होत असतो. काही वेळेस लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस ती वाढते. ही वाढ किंवा घट पुढील घटकांशी निगडित असते. यात प्रामुख्याने जन्मदर, मृत्युदर, सरासरी आयुर्मान, स्थलांतर इत्यादींचा समावेश होतो.
l जन्मदर : एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या जन्मदर दर्शविते.
l मृत्युदर : एका वर्षाच्या कालावधीत दरहजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्युदर दर्शविते.
l आयुर्मान : एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी म्हणजे आयुर्मर्यादा.
l स्थलांतर : व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे. एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे अंतःस्थलांतर किंवा त्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिःस्थलांतर.
वरील सर्व घटकांचा लोकसंख्या वाढीवर परिणाम होतो. जन्मदर व मृत्युदरातील फरक ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरीत्या होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाचे स्थलांतर लोकसंख्येत सतत बदल घडवितात. लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे प्रदेशातील संसाधनांवर ताण पडतो; याउलट लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल तर संसाधनांची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते. लोकसंख्या नियंत्रणात असणे हे त्या प्रदेशाच्या विकासाचे निर्देशक असते.
लोकसंख्या वितरण :
ज्याप्रमाणे चवळीचे दाणे दोन वेगवेगळ्या आकारमानांच्या क्षेत्रा त विखुरले जातात, तसे मोठ्या क्षेत्रा त वितरण विरळ दिसते तर कमी आकारमानाच्या क्षेत्रात वितरण दाट दिसते. आकृती ७.१ पहा. प्रदेशाची लोकसंख्यादेखील त्या प्रदेशांत कशा रितीने विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. प्रदेशानुसार काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असते. भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न असते. काही विभाग साधनसंपत्तीने संपन्न असतात, तर काही प्रदेशात साधनसंपत्ती मर्यादित स्वरूपात असते. या परिस्थितीचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो.
मुबलक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्या जास्त असते. या भागात लोकसंख्या वितरण दाट असते, तर साधनसंपत्ती कमी असलेल्या तसेच अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंचसखलपणा जास्त असलेल्या भागात लोकसंख्या कमी असते. या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते.
लोकसंख्येची घनता :
देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता, लोकसंख्या वितरणाचे विवेचन करताना लोकसंख्या घनतेचा विचार केला जातो. घनता खालील सूत्रानुसार काढली जाते.
लोकसंख्या घनता = प्रदेशातील लोकसंख्या / प्रदेशाचे क्षेत्रफळ.
एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किमीमध्ये किती लोक राहतात हे समजते. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. काही प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असल्याने घनता जास्त आहेत. उदा., गोवा. काही प्रदेश क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी असल्याने तेथे घनता कमी असते. उदा., राजस्थान
लोकसंख्येची रचना : लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकांत वर्गवारी करता येते. उपघटकांमधील परस्पर सहसंबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना व गुणवत्ता समजते.
लिंग गुणोत्तर : लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वांत नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय. लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे सम प्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री-पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. हे प्रमाण पुढीलप्रमाणे काढले जाते.
लिंग गुणोत्तर प्रमाण = स्त्रियांची एकूण संख्या / पुरुषांची एकूण संख्य × १०००.
दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात, तर दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात.
ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते, त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे बहिःस्थलांतर जास्त असते. हे स्थलांतर बहुतेकदा रोजगारानिमित्त होते. उदा., केरळ. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते तेथे प्रामुख्याने स्त्रियांचा जन्मदर कमी असतो.
वयोगट प्रमाण : एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटांनुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठीही होताे.
भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे १५ ते ५९ या वयांतील व्यक्तींचा गट. हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखला जातो. या गटातील व्यक्ती नोकरी, व्यवसायात व्यस्त असतात. प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरीत्या सहभागी असतात. ज्या प्रदेशात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो.
अवलंबित लोकसंख्येचे दोन उपगट केले जातात. १५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. ६० वर्षेव त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती देखील अवलंबित गटांत येतात, परंतु त्यांचे ज्ञान व अनुभव हा या गटाचा अमूल्य ठेवा असतो व तो सर्व समाजाला उपयुक्त ठरतो.
कार्यानुसार लोकसंख्येची रचना : प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटांत वर्गीकरण केले जाते. जे लोक कार्यक्षम वयोगटांत असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत, त्यांना अकार्यकारी समजले जाते. अकार्यकारी गटांतील लोक हे कार्यरत लोकांवर अवलंबून असतात. जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल, तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते. अशा प्रदेशाचा विकास वेगाने होतो.
निवासस्थान : प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटांत केली जाते. ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. नागरी भागात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. ग्रामीण लोकसंख्या ही प्रदेशातील अन्नधान्याची उत्पादक असते. नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असते.
साक्षरता : समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही निरक्षर असतात. आपल्या देशांत व्यक्तीस लिहिता-वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते. ही व्याख्या वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते.
वय वर्षे ०७ पेक्षा अधिक वयोगटांतील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते. साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो. साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो.
स्थलांतर : स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे. स्थलांतर हे अल्पकाळ, दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी असते. उदा., विवाह, शिक्षण, व्यवसाय, बदली, पर्यटन, नैसर्गिक आपत्ती, युदध ् इत्यादी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. स्थलांतराचे अनेक प्रकार केले जातात. लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते. त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. याउलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवासुविधांवर ताण पडतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेतही बदल होत असतो.
लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे प्रदेशातील लोकसंख्येचे पुनर्वितरण होते. लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो. वरील तक्त्यात काही देशांमधील स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेल्या देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व व्यवसायाच्या संधी, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता, आर्थिक विकास इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. याउलट राजकीय व सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासलेपण इत्यादी कारणांमुळे स्थलांतरितांचे प्रमाण कमी असते. भारतासारख्या देशात स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्त असल्याचे दिसून येते.
लोकसंख्या – एक संसाधन : कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक िकासात लोकसंख्या हे संसाधन महत्त्वाचे असते. लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट यांबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टींचा विचार लोकसंख्येस संसाधन मानताना केला जातो. लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो.
पृष्ठ क्र. ४२ वर अगोदर दिलेल्या ‘सांगा पाहू’ मधील उदाहरणात तुम्ही पाहिले की ‘अ/ ब’ शहराची लोकसंख्या वाढली. याचा अर्थ तिथे लोकसंख्येमध्येवृद्धी झाली. पण तुम्ही तिथल्या ‘विकासाबद्दल’ काही सांगू शकता का? म्हणजे जर तिथे वाढलेल्या लोकसंख्येला राहायला घरं नसतील, प्यायला पुरेसे पाणी नसेल, तर फक्त वृद्धीचा काय उपयोग? विकास मोजण्याचा आधार काय? त्या शहरात किती लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले किंवा किती मुले शाळेत जाऊ लागली आहेत किंवा कुठल्या शहरातील लोकं अधिक आनंदी आहेत? वृद्धी म्हणजे विकास नव्हे! मग विकास मोजावा तरी कसा?
बरीच दशके एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जायचा. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित समजला जायचा, पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. खरं म्हणजे विकासाचा संबंध लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य यांवर अवलंबून असते.
१९८० आणि १९९० च्या दशकात महबूब-अल[1]हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) मार्फत प्रकाशित केला जातो.
मानवी विकास निर्देशांक :
आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे हा विचार आता सर्वमान्य झालेला आहे. हा विचार केवळ व्यक्तिसापेक्षच नव्हे तर तो प्रदेश किंवा राष्ट्रसापेक्षही आहे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेला. हा निर्देशांक ठरविताना प्रामुख्याने तीन निकष विचारात घेतले जातात.
l आर्थिक निकष (सरासरी राहणीमान)
l आरोग्य (अपेक्षित आयुर्मान)
l शिक्षण (शैक्षणिक कालावधी)
मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य शून्य ते एक या दरम्यान असते. अित विकसित प्रदेशाचा निर्देशांक एकच्या जवळ असतो तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसजसे कमी असेल तसतसा हा निर्देशांक कमी कमी होत जातो. एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक शून्याच्या जवळ असतो.
महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता :
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता खालील बाबी लक्षात येतात. महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी असून पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण व नागरीकरणाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे (पूर्वीचा), पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता जास्त आहे. नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांत लोकसंख्येची घनता मध्यम आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशातील जिल्हे व अति पूर्वेकडील घनदाट वने असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे.
माहीत आहे का तुम्हांला ?
लोकसंख्येशी निगडित विविध घटकांची माहिती आपल्याला प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळते. सर्वच देशांमध्ये असे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाला जनगणना म्हणतात. भारतात हे सर्वेक्षण दर दहा वर्षांनी दशकारंभी होते. या आधीचे सर्वेक्षण २०११ साली झाले. या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग वर्गीकरण, आलेखाद्वारे सादरीकरण, तुलना, नियोजन इत्यादी महत्त्वाच्या कामांसाठी करतात.