७. स्वराज्याचा कारभार

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांतील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत.

अष्टप्रधान मंडळ : महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले. राज्यकारभाराच्या सोईसाठी त्याची आठ खात्यांमध्ये विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. आठ खात्यांत आठ प्रमुख मिळून ‘अष्टप्रधान मंडळ’ बनले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे, हा महाराजांचा अधिकार होता. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते.

शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत; रोख पगार मात्र भरपूर दिला.

शेतीविषयीचे धोरण : शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये, अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी वा अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रुसैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला, तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यांमध्ये सूट देण्यात यावी, हा त्यांचा अादेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे पुरवावे, अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञा होती.

तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण : शेती व्यवसाय

हा खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात घोड शेतीव्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत. ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. या अर्थाने खेडे स्वयंपूर्ण अ होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो ‘सर वाटा कारागिरांना देत. या वाट्यास बलुतं असे होत म्हणत.

व्यापार व उदयोग : व्यापारवृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते. व्यापाऱ्यांमुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूंची मुबलकता वाढते. व्यापार वाढतो. संपत्तीत भर पडते. ‘साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा’ हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाऱ्यांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. ‘साहुकार’ या शब्दाचा ‘व्यापारी’ असा अर्थ आहे.

स्वराज्यातील उदयोगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उदयोग होय. त्यांनी कोकणातील मीठ उदयोगाला संरक्षण दिले. त्या वेळी पोर्तुगिजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो, हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगिजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली. पोर्तुगिजांकडून येणारे मीठ महाग होऊन त्याच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी, हा यामागचा हेतू होता.

लष्करी व्यवस्था : महाराजांच्या लष्कराची विभागणी दोन भागांमध्ये होती. एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत. पायदळाच्या प्रमुखास ‘सरनोबत’ म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. घोडदळात दोन प्रकारचे घोडेस्वार होते. एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत, तर बारगिराला सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात. घोडदळात बारगिरांची संख्या अधिक होती. घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असत. ‘सरनोबत’ हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध होते.

हेर खाते : स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करणे आवश्यक होते. यासाठी शत्रूच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेरखात्याकडे होते. त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वी माहिती आणली होती. तेथील खडान्खडा

किल्ले : मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला, की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. किल्ल्यावर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, दारूगोळा यांचा साठा करता येतो. स्वराज्यस्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे ते असे, ‘हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. ‘

स्वराज्यामध्ये सुमारे ३०० किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे डोंगरी किल्ले बांधले. किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी असत. तेथील धान्याची कोठी आणि युद्धसाहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे.

सागरी किल्ले : महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखले. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी पाच खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी सिद्दीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, ‘पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली.’

आरमार : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्यविस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्‍चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी आरमार उभे केले. ‘ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ हे त्यांनी ओळखले. महाराज दूरदर्शी होते.

महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची चारशे जहाजे होती. यांमधील गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती. कल्याण-भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात. मायनाक भंडारी व दौलतखान हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते.

प्रजेच्या हिताची काळजी : इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे, एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. प्रजेला स्वतंत्र बनवणे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवून द्यायचा असेल,

तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे, याचे भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते, हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते.