भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय
अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार, विकास यांवर अवलंबून असते.
भौगोलिक स्पष्टीकरण
आकृती ८.१ मध्ये आपण पाहिले, की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे. ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तूनिर्माण उद्योगात अग्रेसर असून, या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले, तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्थासुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. त्यांचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले, तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी पुढील तक्ता वापरा.
अमेरिकेची संयुक्त संस्थानेहा विकसित देश आहे. या देशामधील लोकसंख्या जास्त असली तरीही भारतापेक्षा कमी आहे तसेच ती साक्षर आहे. या देशांकडे अनेक स्वामित्व हक्क (पेटंट्स), आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा खूप पुढे आहे. भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग यांबाबत हे देश प्रगतिपथावर आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे
शेती : ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यांमुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात. भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके आहेत. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्यभागात घेतले जाते. कॉफी, सोयाबीन, काकाओ (कोको), रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास झिराइस, सावो पावलो या राज्यांत घेतले जाते. या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादनसुद्धा घेतले जाते.
गवताळ प्रदेशात गाई, शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन हे व्यवसाय येथे चालतात.
खाणकाम : ब्राझीलचा पूर्वभाग लोहखनिज, मँगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे. दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज साठ्यांसंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.
मासेमारी : ब्राझील देशाला सुमारे ७४०० किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. थंड व उष्ण प्रवाहांचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंडमंच यांमुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभले आहे. मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो. प्रामुख्याने स्वाेर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचरांची पकड केली जाते.
ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही.
भारतातील शेती :
भारतात ब्राझीलच्या तुलनेने स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक अाहे; शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही जास्त आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे ६०% भूभाग लागवडीखाली आहे. याची मुख्य कारणे म्हणजेविस्तीर्ण मैदाने, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, हवामानातील वैविध्य ही आहेत.
भारतातील शेती ही मुख्यत्वेनिर्वाह प्रकारची आहे. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. भारत हा विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे.
मासेमारी : भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाची भूमिकाही महत्त्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे. आहारातील एक घटक, रोजगारनिर्मिती, पोषणस्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो.
केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासेहा महत्त्वाचा घटक आहे. भारताला एकूण सुमारे ७५०० किमीचा सागरी किनारा लाभला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास ४०% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंग इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. बंगालच्या उपसागरात शेवंडे, लबी चकई (क्लूपिड्स), रावस इत्यादी जलचर आढळतात.
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये चालते. कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत. देशाच्या एकूण मत्स्यव्यवसायापैकी सुमारे ६०% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते.
खाणकाम : भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगढमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्रप्रदेशात कडाप्पा या दगडांच्या खाणी आहेत
ब्राझीलमधील उद्योग : प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद, वाहनजोडणी, खनिज तेलप्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंटनिर्मिती इत्यादींचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले, तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे.
भारतामधील उद्योग : भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झाले आहेत. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगांचे असमान वितरण झालेलेआहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत धातूखनिजांचेसाठेआहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातुनिर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. बहुतांश लोह-पोलाद उद्योग या भागात केंद्रित झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेलेकोळशाचेसाठेआणि लोहखनिज साठेहेआहे. त्याचबरोबर दामोदर-महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्रांकडून मि ळणारी अखंडित स्वस्त वीज यांमुळेदेखील या प्रदेशात धातूउद्योगांना अधिक अनुकूलता लाभली आहे. राजस्थानात तांबे, शिसे आणि जस्त, कर्नाटकात लोह-पोलाद, मॅंगनीज व अॅल्युमिनिअम आणि तमिळनाडूत
अॅल्युमिनियम हेधातुउद्योग विकसित झालेआहेत. शेतीवर आधारित उद्योगांमध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेलेआहे. उदा., महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी. विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी. वनोत्पादनांवर आधारित उद्योग केंद्रित झाले आहेत. कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात काथ्या, फळप्रक्रिया, मासेप्रक्रिया इत्यादी उद्योगांचेकेंद्रीकरण झालेलेआहे.
कोयाली, दिग्बोई, नूनमती आणि बोनगाईगाव ही तेलशुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. मथुरा आणि बरौनी ही तेलशुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ती तेल उत्पादन क्षेत्रांपासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचेवितरण हेसुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या उपलब्धतेवर आधारलेलेआहे. गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचेउत्पादन होते. यांत्रिक, विद्युत, वाहन, खतेआणि असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादने, ज्या उद्योगांचे कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी असते असेउद्योग देशात अनेक भागांमध्ये विखुरलेलेआहेत. प्रामुख्यानेमोठ्या शहरांतून या उद्योगांचेकेंद्रीकरण झालेले आढळते.
व्यापार :
ब्राझीलमधून प्रामुख्याने लोहखनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात केली जाते. ब्राझील यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादींची आयात करतो. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया अाणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा २५% आहे. आकृती ८.५ चेनिरीक्षण करा आणि ब्राझील व भारताच्या व्यापाराची तुलना करा.
भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडे, कातडी वस्तू, लोहखनिज, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो; तर खनिज तेल (पेट्रोलियम), यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, साेने, चांदी, कागद, औषधे इत्यादी आयात करताे. युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.
भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारली आहेत. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणात आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैवइंधन इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे
माहीत आहे का तुम्हांला ?
गेल्या १५० वर्षांपासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे, म्हणूनच या प्रदेशाला जगाचा ‘कॉफी पॉट’ असे संबोधले जाते. कॉफी ही इथियाेपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी अठराव्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील ‘पारा’ राज्यात कॉफीची लागवड केली. कॉफीच्या मळ्यांना ‘फझेंडाॅस्’ (Fazendos) असे म्हटले जाते.
माहीत आहे का तुम्हांला ?
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग असतो. देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यांवर एकच कर असावा, या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित करांऐवजी वस्तू व सेवा करप्रणाली (GST) २०१७ पासून अवलंबली आहे. ब्राझीलनेही कर प्रणाली १९८४ पासूनच स्वीकारली आहे.