भौगोलिक स्पष्टीकरण
वरील कृतीच्या चर्चेतून तुमच्या असे लक्षात येईल, की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला.
अर्थशास्त्र ही संज्ञा ओईकोनोमिया (OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे. याचा अर्थ ‘कौटुंबिक व्यवस्थापन’ असा आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यांत बरेचसे साम्य आहे.
वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा, हे अर्थशास्त्रामुळे समजते. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात, याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांच्या मते, अमर्याद गरजा (हाव) आणि मर्यादित, दुर्मीळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय.
कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते, तसेच गावांचे/शहरांचे, राज्यांचे, देशाचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते.
भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, तसेच वस्तू व सेवांचा उपभाेग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय.
अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण :
सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते, की जेथे नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो.
जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय. यामध्ये मुक्त व्यापार असतो व गुंतवणुकीवरील सर्व बंधने काढून टाकली जातात.
अर्थव्यवस्थेची कार्ये :
प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी असते. तरीही प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरलेली असतात. अर्थव्यवस्थेची काही कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.
- कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घेणे.
- उत्पादनखर्चात जास्तीत जास्त काटकसर करणे.
- राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे.
- भविष्यकाळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे.
- उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे.
- अशाप्रकारे अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेत केला जातो.