८. आदर्श राज्यकर्ता

स्वराज्यस्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस सामाेरे गेले. त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. महाराजांनी आपल्या कर्तृ्वाने नूतन सृष्टीच निर्माण केली. स्वराज्यस्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शायिस्ताखानावरील छापा, आग्ऱ्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. त्यांनी या सर्व प्रसंगांवर यशस्वी मात केली. त्यांतून ते सुखरूपपणे बाहेर पडले.

संघटन चातुर्य : स्वराज्यकार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले. त्यांच्याकडे विलक्षण संघटनचातुर्य होते. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्याभोवती शूर व जीवास जीव देणारे लोक गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकाऱ्यांनी अापल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. अफजलखान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जिवा महाला, पन्हाळगडचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशिद, महाराज विशाळगडाकड जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहेतर अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असत. उदाहरणार्थ, स्वराज्यस्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले. त्या वेळी महाराजांनी त्यांना ‘औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये’ असे सांगितले.

 रयतेची काळजी : स्वराज्यस्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूंशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होत असे. अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. शायिस्ताखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिडखोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. या कार्यास ‘एका घडीचा दिरंग न करणे’ असे त्यास बजावले. पुढे महाराजांनी त्याला पुढीलप्रमाणे सक्त ताकीद दिली, ‘जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल.’ आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये, अशी काळजी महाराज घेत असत.

 लष्करविषयक धोरण : महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे, याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था मध्ययुगीन भारतात केली. ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात, तेव्हा सैनिकांस जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत, त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत.

सहिष्णू वर्तन : महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला, त्यांच्यापैकी आदिलशाह, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. अफजलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहीम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलतखान हा महत्त्वाचा अधिकारी होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता, तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोई सवलती ते तशाच चालू ठेवत. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफिखान लिहितो, ‘शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता, की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुरआनची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी.’

स्वातंत्र्याची प्रेरणा : शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणे, हा हेतू त्यामागे आहे. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला, तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली.

महाराजांच्या कार्याची थोरवी : महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली, ही कृतीच त्यांचे युगप्रवर्तकत्व सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विदया आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. आई-वडिलांनी केलेले स्वराज्यस्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण होते.

स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत. स्वधर्मातील व्यक्तींप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता, त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता, त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणांची दखल घेऊन त्यावरचा उपाय त्यांनी तयार ठेवला होता, असा याचा अर्थ होतो. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले. त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारकत्व दर्शवणाऱ्या आहेत.

स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकटे येत, तेव्हा सहकाऱ्यांऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत. त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. अर्थात केवळ अशा

मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणाने सामोरे जाणे, एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार दयायचा होता. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीदेखील जबरदस्तीने घेता कामा नये, या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. त्यांनी झाडे तोडण्यावर घातलेली बंधनेही महत्त्वाची आहेत.

किल्ल्यावरील कचरा इकडे-तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा, असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक-सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते, हे यावरून स्पष्ट होते. ते केवळ योद्धे नव्हते तर ते एका नव्या, स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सर्वांगीण आहे.

सांगा पाहू!

  • तुमच्या परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे होते ?

कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेची नावे सांगा.आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा जोतीराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितली.

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पसु्तक लाला लजपतराय यांनी लिहिलले े आहे. तमीळ काव्याचे पितामह सब्रमण ु ्यम भा.रती ् यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत, असा प्रसंग कल्पून काव्यरचना केली.

आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्यसाधनेच्या प्रयत्नांकडे ते ‘थोर ध्येयसाधनेचे प्रयत्न’ म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांनी ‘शिवाजी ॲण्ड हिज टाईम्स’ या ग्थात रं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पं.जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की, ‘महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते… त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते.’ भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालले े आहे.

 शिवाजी महाराजांची ही स्वराज्यकार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष होते.