८. आपली अस्थिसंस्था व त्वचा

कधी कधी आपण खेळताना पडतो किंवा आपल्याला अपघात होतो, तेव्हा आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडते यालाच आपण ‘अस्थिभंग’ असे म्हणतो. अस्थि म्हणजे हाड.

अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला असह्य वेदना होतात व ज्या भागाला अस्थिभंग झाला आहे तेथे लगेचच सूज येते.

शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिये सुरक्षित असतात. आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणारे मानवी सांगाडा हे एक संरक्षक कवच आहे.

तुमच्या एखादया मित्राला अपघात झाला व त्याच्या पायाचे हाड मोडले तर तुम्ही काय कराल ?

अपघात झाल्यावर अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ देऊ नये, तो स्थिर ठेवावा व वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जावे. दवाखान्यात गेल्यानंतर ज्या भागाला सूज आलेली आहे, त्या भागाची ‘क्ष-किरण प्रतिमा’ (X-ray image) घेतात. क्ष-किरण प्रतिमेचा शोध ‘रॉन्टजेन’ यांनी लावला आहे.

क्ष-किरण प्रतिमेच्या आधारे हाड नेमके कोठे मोडले आहे याची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे योग्य उपचार करणे शक्य होते.

करून पाहूया.

चला, आपण आपली हाडे ओळखूया.

१. तुमच्या पाठीवर तसेच तुमच्या मित्राच्या पाठीवर मध्यभागी हात फिरवा.

२. तुमच्या छातीवर हात ठेवून जाणवणाऱ्या कठीण भागास काय म्हणतात ?

३. कठीण उंचवटे जाणवतात का ? त्यांना काय म्हणतात ?

४. पाठ व छाती यांतील हाडांच्या आकारांमध्ये काय फरक जाणवतो ?

मानवी अस्थिसंस्था

आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाड हे वेगळे आहे. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. सांगाड्यामुळे शरीराला आकार प्राप्त होतो.

शरीरातील सर्व हाडे व कूर्चा एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते.

हाडांची रचना कठीण असते. हाडे लवचीक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे दोन घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशी या जैविक असतात, तर कॅल्शिअम कॉर्बोनेट, कॅल्शिअम फॉस्फेट, खनिज, क्षार यांसारख्या अजैविक पदार्थांपासून हाडे बनतात. कॅल्शिअममुळे हाडांना मजबूतपणा येतो.

शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था म्हणतात.

एक मोजपट्टी घ्या व तुमच्या हातांच्या व पायांच्या हाडांची लांबी मोजा. आता हीच कृती तुमचा मित्र / बहीण / भाऊ यांच्या संदर्भात करून हाडांच्या लांबीसंदर्भात तुलना करा व माहिती पुढील तक्त्यात भरा.

मानवी अस्थिसंस्था ही दोन भागांमध्ये विभागली जाते. अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा असे मानवी अस्थिसंस्थेचे दोन भाग आहेत.

अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा व छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो. ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती (मध्यभागी ) असतात.

उपांग सांगाडा हा या मध्यरेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तयार झालेला असतो. यामध्ये हात, पाय या हाडांचा समावेश होतो.

आपल्या शरीराची वाढ होताना हाडांची लांबी व आकार वाढत जातो. लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी व आकारांत फरक दिसून येतो. परंतु शरीराची वाढ ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते. उंच व्यक्तीच्या पायांतील हाडांची लांबी अधिक असते.

अक्षीय सांगाडा

कवटी : डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी बनते. यातील हाडे आकाराने सपाट व मजबूत असतात. डोक्यात ८ आणि चेहऱ्यामध्ये १४ अशी एकूण २२ हाडे कवटीमध्ये असतात. कवटीमधील खालचा जबडा सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही.

कवटी आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवांचे संरक्षण करते ?

छातीचा पिंजरा : तुमच्या छातीच्या डाव्या व उजव्या बाजूवरून हात / बोट फिरवा. दोन्ही मिळून किती हाडे आहेत ? मध्यभागी बोट फिरवा. किती हाडे जाणवतात ?

छातीमधील पिंजऱ्यासारखी रचना असणाऱ्या भागाला ‘छातीचा पिंजरा’ असे म्हणतात. छातीत एक उभे चपटे हाड असते त्याला उरोस्थी म्हणतात. त्याला आडव्या चपट्या बरगड्यांच्या १२ जोड्या जोडलेल्या असतात. या २५ हाडांचा मिळून छातीचा पिंजरा तयार होतो. तो मागून पाठीच्या कण्याला जोडलेला असतो.

पाठीचा कणा कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. पाठीच्या कण्यात एकूण ३३ हाडे असतात. त्यातील प्रत्येकाला मणका म्हणतात. ती सर्व हाडे लवचीक असून एकावर एक अशी रचलेली असतात. पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण करतो.

आपल्याला पाठीचा कणा नसता तर काय झाले असते ?

उपांग सांगाडा

हात व पाय मानवी शरीरात दोन हात व दोन पाय असतात. हात व पायांच्या विविध भागांमध्ये अनेक हाडे असतात. ती एकमेकांना सांध्यांनी जोडलेली असतात.

करून पहा.

डोक्यापासून पायांपर्यंत तुमच्या शरीराची वेगवेगळ्या ठिकाणी हालचाल करून पहा. शरीराचे भाग कोणकोणत्या ठिकाणी वाकतात किंवा फिरवता येतात याचे निरीक्षण करा. आपल्या शरीरातील हाडे एकमेकांशी अस्थिबंधाने जोडलेली असतात.

सांध्याचे प्रकार

१. बिजागिरीचा सांधा

या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल एकाच दिशेने शक्य होते. या सांध्यांची हालचाल १८० कोनात होते. उदा. कोपर व गुडघा

२. उखळीचा सांधा

या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल दोन किंवा अधिक दिशांनी होते. या सांध्यांची हालचाल ३६० कोनात होते. उदा. खांदा, खुबा

३. सरकता सांधा

या प्रकारच्या सांध्यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात. उदा. मनगट, पायाचा घोटा यांमधील सांधे

त्वचा

त्वचा ही सर्व सजीवांच्या शरीराचा एक महत्त्वाचा व मोठा अवयव आहे. त्वचेवर केस असतात तर पायांच्या व हातांच्या बोटांच्या टोकावरील त्वचेवर नखे असतात. त्वचा या अवयवामुळे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते. त्वचा हे आपल्या शरीराचे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे.

शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात.

त्वचेची रचना :

मानवी त्वचा ही मुख्यत्वे दोन थरांची बनलेली असते. सर्वांत वरच्या थराला बाह्यत्वचा म्हणतात, तर त्याखाली थराला अंतत्वचा म्हणतात. त्याखाली रक्तवाहिन्या व मज्जातंतूचे जाळे असते. त्याच्या खाली उपत्वचीय थर असतो. तो शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतो. बाह्यत्वचेचे वेगवेगळे थर असतात.

त्वचेची कार्ये :

१. शरीराच्या अंतरंगाचे जसे, स्नायू, हाडे, इंद्रियसंस्था इत्यादींचे रक्षण करणे.

२. शरिरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे.

३. ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती करणे.

४. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे.

५. उष्णता, थंडी यांपासून संरक्षण करणे.

६. त्वचा स्पर्शेद्रिय म्हणून कार्य करते.

सांगा पाहू !

उन्हात चालल्यामुळे अथवा उन्हात खेळल्यामुळे काय होते ?

उन्हातून चालून आलो अथवा खेळत राहिलो तर आपण थकतो, पण त्याच वेळी आपली त्वचा ओलसर झालेली दिसते. यालाच ‘घाम’ म्हणतात. आपल्या त्वचेमध्ये घाम तयार करणाऱ्या ग्रंथी असतात, त्यांना घर्मग्रंथी म्हणतात.

आपण उन्हात खेळलो किंवा इतर कारणाने शरीराला श्रम झाले, की शरीराचे तापमान वाढते तेव्हा घामाची निर्मिती होते व आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७° सेल्सिअसच्या जवळपास कायम राहते.

मेलॅनिन

त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होते. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा काळेपणा ठरतो. वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांचे अतिनिल किरणांपासून संरक्षण करते.

तुमची त्वचा व तुमच्या आजी/आजोबांच्या अथवा घरातील वृद्ध व्यक्तीच्या त्वचेचे निरीक्षण करा.

काय फरक दिसतो ? जसे वय वाढते, तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते, मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही म्हणून वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात.