८ उद्योग व व्यापार

या पाठात आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार यांविषयी माहिती घेणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी १९४८ मध्ये ‘भारतीय औद्योगिक वित्त महामंडळा’ची स्थापना औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने करण्यात आली. तसेच १९५४ मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय ‘औद्योगिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्यात आली.

 भारतातील काही उद्योग

वस्त्रोद्योग : देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे १४% आहे. वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. हातमाग उद्योग श्रमप्रधान आहे. ‘टेक्सटाईल कमिटी ॲक्ट १९६३’ नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे.

रेशीम उद्योग : वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते. रेशमी किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन बंगळूरू येथील ‘सेरिबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी’ मध्ये केले जाते. हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर या राज्यांत आहे. तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासीबहुल राज्यांत केला जात आहे.

ताग उद्योग : ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होते. तागापासून कापड, गोणपाट, दोरखंड इत्यादी वस्तूमिळतात.

हस्तशिल्प : हे श्रमप्रधान क्षेत्र आहे. अधिक रोजगार क्षमता, कमी गुंतवणूक, अधिक नफा, निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यांमुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला. ग्रामीण व शहरी क्षेत्रांतील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘दिल्ली हाट’ यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरांत सुरू केलेली आहे. त्यांतील मुंबई हे एक शहर आहे.

वाहन उद्योग : वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात. भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ असे म्हटले जाते. उदा. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वांत मोठा असून जगाच्या १/३ ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. भारताचे ट्रॅक्टर तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात.

सिमेंट उद्योग : गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्त्वाची अाहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्त्वाचा देश आहे.

चर्मोद्योग : भारतातील मोठा उद्योग असून हा निर्याताभिमुख उद्योग आहे.

मीठ उद्योग : भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे. भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन २०० लाख टन होते. आयोडिनयुक्त मिठाचे उत्पादन ६० लाख टन इतके होते.

सायकल उद्योग : सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पंजाब आणि तमिळनाडू या राज्यांत सायकलींचे उत्पादन होते. लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. भारत नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात करतो.

खादी व ग्रामोद्योग : ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीरोद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघुउद्योगांचा विकास करावा व रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे ही आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्‌दिष्टे होती.

शेती उद्योग : भारतात पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. शेतीची अनेक कामे बैलांच्या मदतीने केली जातात. तसेच यंत्रांचा वापर नांगरणी, पेरणीपासून-कापणी, मळणी इत्यादी कामांत होत आहे. भारताचा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि शेतीवर आधारित इतर कामे हा आहे. खेड्यापाड्यांत शेती व पशुपालन व्यवसाय चालतो. शेतीची कामे व शेती उत्पादन यांवर ७०% समाज अवलंबून आहे. शेती उद्योगात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही वाटा मोठा आहे. भारतात शेती व्यवसाय विविध हंगामांत चालतो. अनेक प्रकारची पिके शेतात घेतली जातात. ज्वारी गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया यांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. त्याबरोबर कापूस, ऊस यांच्यावर प्रक्रिया करून कापड, साखर हेही उद्योग चालतात.

फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीतूनच होत आहे. अलीकडे यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग चालत आहेत. शेतीमधून मानवाच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशींचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाउस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

भारत अन्नधान्य उत्पादनात आणि पीक पद्धतीत स्वयंपूर्ण होत आहे. ठिबकसिंचन, सेंद्रीय शेती यांसारख्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे.

भारत सरकारचे धोरण : चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार-ट्रॅक्टर उद्योग, कातड्याच्या वस्तू, वस्त्रोद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. १९७० च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार पाच कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योगक्षेत्रात आणण्याचे ठरवले. सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गंुतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योगसंस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले. या धोरणानुसार १९७२ अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात ३ लाख १८ हजार लघुउद्योग नोंदवले गेले.

खनिज संपत्ती : देशाच्या आैद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मँगनीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडले आहेत.

वनसंपत्ती : वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत. जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यांवर आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत.

मत्स्योद्योग : नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यांतून मत्स्योत्पादन होते. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदरांचा विकास, मत्स्यबीज उबवणी केंद्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

पर्यटन उद्योग : भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा केल्या जातात. या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातूनही रोजगार उपलब्ध होतो.

व्यापार आयात-निर्यात : १९५१ मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होताे. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

अंतर्गत व्यापार : भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. मुंबई, कोलकता, कोची, चेन्नई, ही बंदरे महत्त्वाची अाहेत. अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. देशातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा उंचावतो. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. एकूणच देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. पुढील पाठात आपण भारतीय लोकांचे बदलते जीवन याविषयी माहिती घेणार आहोत.