८. गचकअंधारी

एका गावात सदा व सखू नावाचे जाेडपे राहत हाेते. त्यांना गजानन नावाचा मुलगा हाेता. त्यांचा गाडगी, मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोेशीतील गावांतल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत. ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा.

सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून दोन-तीनदा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात, हे लहानग्या गजाननला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत.

एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या. शिदोरी बांधून दिली. त्या वेळी गज्या गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले, की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायांत सरकवल्या. तो बाहेर पडणार, तोच गज्याला नेमकी जाग आली.

खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला, ‘‘मी येतो, मी येतो.’’ सदाने डोक्याला हात लावला. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या. गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंजूमुंजू होताच इथून निघून जाऊ, या हिशेबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध, तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती.

साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते.

 सदा विचार करत म्हणाला, ‘‘बाबू, तुले म्या नेलं असतं, पन अंधार किती हाय. रातच हाय ना अजून.’’

 गज्या उसळला, ‘‘असू द्या. मी येतो, मी येतो.’’ ‘‘लेका, रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं.’’

‘‘असू द्याऽऽ.’’

 ‘‘लाहान लेकराले उचलून नेते म्हंतात तो.’’

‘‘निऊ द्या. कै नै, मी येतो… येतो…’’

 ‘‘तिकळे लांडगा येते मंग.’’ ‘‘यिऊ द्या. मी येतो. येताे म्हंजे येतोऽऽ.’’

 ‘‘पुळे जंगल लागते. जंगलात वाघ असते या टैमाले.’’ ‘‘हूं ! असू द्या.

कै भेव नोका दाखू मले वाघा- फाघाचा.’’ ते एेकून वाघ मनाशी म्हणाला, ‘लाेयच आटेल पोट्टंदिसून रायलं.’ ‘‘अन्वाघानं खाल्लं त तुले?’’ सदानं म्हटलं. तसा गज्या तोंड वेडावत म्हणाला, ‘‘मले खाल्लं त तो काय तुमाले सोळनार हाये काय? कै नै मले मैत हाये. मी यिऊ नोय म्हनून तुमी मले भेव दाखून रायले.’’ सदाने विचार केला. डोळे मोठे करून म्हणाला, ‘‘या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोकाे मले.’’ गज्या गडबडला, ‘‘गचकअंधारी?’’

‘‘हौ, गचकअंधारी.’’

‘‘काय हाेय हे गचकअंधारी?’’ ‘‘गचकअंधारी मैत नै तुले? लेका, गचकअंधारी वाघासिंव्हालेई एका घासात खाते म्हंतात. आपल्याले भेटली त? कै नै भौ, एवळं खतरनाक जनवार तरी हाये काय कोंतं?’’

 ‘‘खतरनाक?’’ आता गज्या हादरला. शहारून आईजवळ पळाला अन म् ्हणाला, ‘‘मी नै येत मंग. जा तुमीच.’’

सदाची युक्ती फळाला आली. वाघ मनातून भ्याला. ‘कोंती गचकअंधारी होय बावा! आपल्याले भेटली त? कै नै भौ, थोळसंक दिसाले लागल्यावर चाल्ले जाऊ अथून.’ सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ, असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला.

भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वत:शी उद्गारला, ‘हाये सायाचं. मी साऱ्या गावात पाहून रायलो अन्हे गधळं पायलं त अथी उभं.’ सदा तरातरा चालत आला. गच्चकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला.

वाघ प्रचंड हादरला. ‘बापरे! हे गचकअंधारी हाय!’ असं स्वत:शी म्हणताना त्याला हिव भरलं. सदानं रपदिशी पायांच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला- ‘लोय जोऱ्यानं चालून रायलं गधळं. बरोबर हाये, राती सट खाल्लं वाट्टे यानं. चाल म्हना लेका. मलेई बरंच हाये. तिकळे गज्या भेला. आता अटालाच नै रायला. आता काय, मस्त बाजारात जानं अन भदाळ इकनं.

स्वारीने गाव ओलांडले. जंगलचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता; पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता, ‘हे देवा, दया कर…मले वाचो. माल्या पाठीवरची ही बला जाऊ दे.’

पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ‘हे कसं काय?’ असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहताे तर काय? साक्षात वाघ ! त्याला कापरे भरले. तो थाड्थाड् उडू लागला. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. मनाशी म्हणू लागला, ‘गचकअंधारी झटके देऊन रायली, म्हंजे आपल्याले खायाची तयारी करून रायली हे.’

सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला, ‘हे इस्वरा, काय बुद्धी देली बावा. गधं सोळून वाघाच्या पाठीवर बसलो अन् हा वाघई मले घिऊन चाल्ला …. पन मी याले दिसलो त?… त हा माही नळ्ली फोळ्ल्याशिवाय राह्यत नै… मले वाचो याच्यातून… या संकटातून तार.’ सदाला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थबथबला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला, तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. ‘घेऽवो. आता त गचकअंधारी पानी सोळून रायली, म्हंजे मले हे आता पान्यात भिजू भिजू खाते.’ ह्या विचाराने वाघाचे काळीज जोरजोरात धडधडू लागले.

कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता. सदाच्या जिवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला, तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. सदा असा अलगत वेगळा होताच, ‘जमलं बाबा ! सुटलो. नाहीतर गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तुही’, असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला !