राधिका या केरळच्या कोदुनगलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागरसफरीला जावं, असं त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आई-वडिलांनी, त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. त्यांना वाटलं होतं, की ही जोखमीची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल? पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं.
पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ‘ऑल इंडिया मरीन कॉलेज’मध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवादप्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या. प्रशिक्षण पूर झाल्यावर, ‘शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया’मध्येप्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर २०१० साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं; पण रोमांचकारी प्रवासामुळं त्या खूश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना! आता त्यांचं लक्ष्य होतं, समुद्री जहाजाची कमान सांभाळायची. त्यांचे हे स्वप्न २०१२ साली पूर्ण झालं. राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांना मर्चंट नेव्हीच्या ‘संपूर्ण स्वराज्य’ या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली.
या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या; परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत. सगळ्यांत कठीण गोष्ट होती, ती म्हणजे मुलाचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हानदेखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली.
२२ जून, २०१५ रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका ‘संपूर्ण स्वराज्य’ जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्याने तात्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली, ‘मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत.’ सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती.
एक क्षणदेखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या पाच मिनिटांत जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता, की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं, की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते जिवाच्या आकांताने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होते; पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती. जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जोराच्या वादळामुळं बचावकार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. दुसरा प्रयत्न केला गेला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते, तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्नदेखील वाया गेला.
सगळ्यांना वाटलं, की आता सगळं संपलं. त्यांना वाचवणं अशक्य आहे; पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात, की त्यावेळी समुद्रात नऊ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळत होत्या. वारा ७० समुद्री मैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते; पण आम्ही हिंमत हरलो नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतील सातही मच्छीमार सहीसलामत वाचले होते. वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, ‘‘पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो, की त्यांची नाव बुडाली. आम्हांला वाटलं, ते जिवंत राहिले नसतील; पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतश: आभारी आहे.’’
या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना ‘ॲवार्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’ या पुरस्काराने सन्मानित केले. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत, ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका सांगतात, ‘‘ज्या वेळी आम्ही जहाजावर असतो, त्या वेळेला आम्ही, आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल, तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं. ’’