८. प्रिय बाई…

दि. ५/९/२०२१

प्रिय बाई,

मला टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात! मी तर आनंदानं उडालेच. हाका मारून आई, बाबा, आजोबांना बोलावलं, पण तेवढ्यात बातमी संपली. जवळपास दीड वर्षांनी तुम्ही मला दिसलात. खूप मस्त वाटलं. तुमची, शाळेची, तिसरीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. मी तुम्हाला मोबाईल लावू लागले, तर ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ ची टेप वाजू लागली.. आजोबा म्हणाले, “अगं, या मोबाईलच काही खरं नाही, त्यापेक्षा पत्र लिही बाईंना कायम आठवणीत राहील त्यांच्या.” मग काय, लगेच हे पत्र लिहायला बसले…

पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. तुम्ही आम्हांला पहिल्यापासून आवडायच्या हे नक्की. तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक हे सगळं आठवलं. सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले. त्यांना एकदम भारी वाटलं. मला तिसरीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच..

पाचवीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागलेय. मला एकदम मोठ्ठी झाल्यासारखं वाटतं. अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास दोन तास मैदानावरच असते.

टीव्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात. तुम्ही कशा आहात ? तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय ? त्याला फुलं येऊ लागली का? ‘आठवण काढली’ म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा. स्वाती, जय आणि सलमाला सांगा, की मी या शाळेतपण फुली-गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवलाय. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो.

तुमच्या पत्राची वाट पाहीन. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन,

तुमची,
ऊर्मिला

माझा पत्ता :
ऊर्मिला माने पिन – ४१५७१२.
मु. पो. ता. दापोली,
जि. रत्नागिरी.