हंबरून वासराले चाटते जव्हा गाय
तिच्यामंदी दिसते मले तव्हा माही माय ॥धृ॥
फनकाट्या येचायले माय जाये रानी
पायात नसे वहान साधी हिंडे अनवानी
इचू काट्यालेबी तिचा मोजत नव्हता पाय ॥१॥
सुट्टीमंदी जव्हा मी येत होतो घरी
उसनं पासनं आणून खाऊ घाले नानापरी
करू नको घाई म्हणे पोटभर खाय ॥२॥
बाप माहा रोज लावे मायच्या मागं टुमनं
बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रूमनं
शिकूनशानी कुठं मोठा सायेब होनार हाय ॥३॥
माय म्हने तुम्हाले माया गयाची हाये आन
भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान
भरून येत डोयात तिच्या तापी-पूर्नामाय ॥४॥
बोलता बोलता एकदा तिच्या डोयात आलं पानी
म्हने कव्हा दिसन सांग मले राजा तुही रानी
या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय ॥५॥
म्हणून वाटते मले तुही भरावं सुखानं ओटी
पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी
अन् ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय ॥६॥