८. स्थिर जीवनाची सुरुवात

८.१ पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात
८. २ खास कौशल्ये आणि विविध व्यवसाय
८.३ परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन
८.४ घरांची रचना
८.५ गाव, नातेसंबंध आणि कुटुंब

८.१ पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात

पशुपालन : कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात. एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत :

१. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे.

२. त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे.

३. त्यांच्यापासून दूधदुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे.

यांतील तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो, तेव्हा त्याला ‘पशुपालन’ असे म्हणतात.सहाव्या पाठात आपण पाहिले होते, की मध्याश्मयुगातील माणसाने कुत्रा माणसाळविला होता. कुत्रा हा माणसाळलेला पहिला प्राणी. शिकार करताना माणसे कुत्र्याचे साहाय्य घेत असत. कुत्र्यानंतर शेळ्या, मेंढ्या माणसाळविल्या गेल्या.

शेती : शेतीचे सुमारे ११ हजार वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि इराक येथे मिळाले आहेत. शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय स्त्रियांना दिले जाते. टोकदार काठीच्या आधाराने स्त्रियाच बी पेरण्याचे काम करत असाव्यात. काही आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात. पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीत खोलवर खणता यावे, म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जातात.

शेतीच्या कामांमुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणे भाग पडले, हे आपण गेल्या पाठात पाहिले आहे. प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने नांगरणी करू लागल्यानंतर शेतीच्या उत्पादनात वाढ झाली.

शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले. शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी लोक निसर्गशक्तींची आणि देवदेवतांची आराधना करू लागले.

शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि गावांचे संरक्षण यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था यांमुळे कृषिप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली.

८. २ खास कौशल्ये आणि विविध व्यवसाय

शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात, शिकार आणि फळे – कंदमुळे गोळा करण्यातून मिळालेले अन्न दीर्घ मुदतीसाठी साठवणे शक्य नसे. त्यामुळे त्या जीवनपद्धतीत समूहातील सर्वच स्त्री-पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात सतत गुंतलेले असत. शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे शक्य झाले. समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले. त्यामुळे, समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन, अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला.

अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे मातीची भांडी बनवणारे, मणी बनवणारे, यांसारखे कारागीर तयार झाले. नवाश्मयुगीन काळातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू घरातील स्त्रियांनी हातांनी घडवलेल्या होत्या, असे मानले जाते.

८. ३ परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन

गावातील शेतकरी आता गरजेपेक्षा अधिक अन्नधान्य पिकवत होते. शेतीची अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे, या आणि इतर अनेक कामांसाठी त्यांना कुशल कारागिरांची गरज होती. कारागिरांना कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात दिला जाई. कारागिरांना विविध वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागत असे. त्याची किंमतही अन्नधान्य आणि वस्तू यांच्या देवाण-घेवाणीतूनच चुकवली जात असे. त्यातून खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. जेव्हा कच्चा माल, तयार वस्तू, दैनंदिन उपयोगाच्या अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाणांहून आयात करण्याची गरज भासे, तेव्हाही विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे. मीठ ही अत्यावश्यक गोष्ट. बहुतेक गावांना मीठ दूरवरून आणावे लागत असे. मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत. मिठाच्या व्यापारामुळे नवाश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली.

गावातील व्यापाराची आणि साधनसंपत्तीच्या वाटपाची ही व्यवस्था सुरळीत चालावी, म्हणून गावातील लोकांनी एकमेकांशी सहकार्य करावे, याचे नियम तयार झाले. त्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे गेली, त्यांना गावाचे कर्तेपण मिळाले. गावाच्या संरक्षणाची जबाबदारी अशा कर्त्या व्यक्तींवर सोपवली गेली. अशा तऱ्हेने गावाची शासनव्यवस्था निर्माण झाली. नवाश्मयुगातील गावांच्या भोवती असलेल्या संरक्षक भिंतींचे आणि खंदकांचे पुरावे मिळाले आहेत. पूर, जंगली जनावरे, तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या भिंती बांधल्या जायच्या.

८.४ घरांची रचना

नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली. गावे स्थिरावत आणि विस्तारत गेली. काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्याचेही दिसते. दोन घरांमध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे. हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घरांच्या बांधणीत स्थानिक बदलही आढळतात.

८.५ गाव, नातेसंबंध आणि कुटुंब

घरांच्या आणि गावांच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते, की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असत. म्हणजेच गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत. त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. एका घरात राहणारे सदस्य निकटच्या नातेसंबंधाने जोडलेले असत, परंतु त्याच वेळी ते गावातील विस्तारित कुंटुंबाचेही सदस्य असत.
मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरत असत. व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये, असा उद्देश त्यामागे असावा. मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडाव्यात, या समजुतीने विविध वस्तूही मृतासोबत पुरण्यात येत असत.