उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
मग शोधतो पातेलं भाजीसाठी…
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.