९. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन

अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ. अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन-जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडित असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात. लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात.

जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात.

 ९.१ इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन

इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात.

  • मौखिक साधने

लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे. संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे. संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे.

उपयुक्त प्रशिक्षण ः (१) समाजशास्त्र (२) सामाजिक मानवशास्त्र (३) मिथके आणि भाषाशास्त्र (४) ग्रंथालय व्यवस्थापन (५) इतिहास आणि इतिहास संशोधनपद्धती (६) संशोधनपर लेखन.

  • लिखित साधने

ताम्रपट, दरबारी दप्तरे, खासगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ. इत्यादी दस्तऐवजांचे संकलन-संपादन करणे. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे.

उपयुक्त प्रशिक्षण १. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. २. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान. ३. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान. ४. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान ५. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती. ६. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यांसाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती. ७. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. ८. संशोधनपर लेखन.

  • भौतिक साधने पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यांनुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. निवडक पुरावस्तूकिंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष (जीवाश्म) यांचे वर्गीकरण करणे. सूची तयार करणे. निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे.

उपयुक्त प्रशिक्षण १. पुरातत्त्वीय अभ्यासपद्धती, सिद्धान्त आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय. २. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान. ३. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिय ांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती. ४. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान. ५. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य. ६. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. ७. संशोधनपर लेखन.

९.२ काही नावाजलेली संग्रहालये

मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयांची कल्पना उदयाला आली.

लुव्र संग्रहालय, फ्रान्स : पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या अठराव्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ‘मोनालिसा’ या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. लिओनार्दो द विंची फ्रान्सचा सोळाव्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलिअन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुव्र संग्रहातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील ३ लाख ८० हजाराहून अधिक कलावस्तू आहेत.

 ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड : लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या अठराव्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहातील सुमारे एकाहत्तर हजार वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यांमुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. आजमितीला या संग्रहालयात सुमारे ऐंशी लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे.

नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका : अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन १८४६ मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तूयांचे बारा कोटींहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत.

जाणून घ्या.

भारतातील प्रसिद्ध संग्रहालये इंडियन म्युझियम, कोलकाता; नॅशनल म्युझियम, दिल्ली; छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई; सालारजंग म्युझियम, हैदराबाद; द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाइल्स, अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत.

भारतातील संग्रहालये : कोलकाता येथील ‘भारतीय संग्रहालय’ हे भारतातील पहिले संग्रहालय ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ या संस्थेतर्फे इसवी सन १८१४ मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन १८५१ मध्ये सुरू झालेले ‘गव्हर्मेंट म्युझियम’ हे भारतातील दुसरे संग्रहालय. इसवी सन १९४९ मध्ये दिल्लीतील ‘राष्ट्रीय वस्तुसंग्रहालया’ची (नॅशनल म्युझियम) स्थापना झाली. आजमितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.

संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे ः १. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, दिल्ली २. महाराज सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा ३. कोलकाता विद्यापीठ, कोलकाता ४. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी ५. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगढ ६. जिवाजी विद्यापीठ, ग्वालियर

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई  :

 इसवी सन १९०४ साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९०५ च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया’ असे निश्चित करण्यात आले. इसवी सन १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ असे ठेवण्यात आले.

संग्रहालयाची वास्तू इंडो-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील ‘पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत’ असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गांत विभागलेल्या सुमारे पन्नास हजार पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत.

 ९.३ ग्रंथालये आणि अभिलेखागार

ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत

संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे, या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय (इ.स.पू़. सुमारे पाचवे शतक ते इ.स.पाचवे शतक), मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानीपाल याचे ग्रंथालय (इ.स.पू़ सातवे शतक) आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय (इ.स.पू़ चौथे शतक) ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये होती असे समजले जाते. तमिळनाडूतील तंजावर येथील ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ हे इसवी सनाच्या सोळाव्या- सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशंजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन १९१८ मध्येया ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील ‘नॅशनल लायब्ररी’, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अ‍ॅन्ड लायब्ररी’, हैदराबाद येथील ‘स्टेट सेंट्रल लायब्ररी’, मुंबई येथील ‘लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी’ आणि ‘डेव्हिड ससून लायब्ररी’ इत्यादी ग्रंथालयांचा समावेश होतो. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन १८९१ मध्ये ‘इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट’ या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन १९११ मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. इसवी सन १९९८ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी ‘राष्ट्रीय अभिलेखागार’ म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे. इसवी सन १७४८ पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खासगी कागदपत्रे अशा चार प्रकारांत केली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात.

९.४ कोशवाङ्मय

कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय, हे त्याचे उद्दिष्ट होय.

कोशाची आवश्यकता : कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोचवले जाते, त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुद्‌द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्‌धिक वा सांस्कृतिक गरज ज्या-ज्या प्रकारची असेल, त्या प्रकारच्या कोशवाङ्मयाची निर्मिती त्या-त्या समाजात होते. कोशातील माहितीच्या मांडणीकरिता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. अद्ययावतता राखण्यासाठी ठरावीक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. कोशरचना करताना अकारविल्हे आणि विषयवार अशा दोन पद्धती ढोबळमानाने वापरतात. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोशवाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासते.

कोशाचे प्रकार : कोशांचे सर्वसाधारणपणे चार विभागांत वर्गीकरण करता येते.

(१) शब्दकोश (२) विश्वकोश (३) कोशसदृश वाङ्मय (४) सूची वाङ्मय.

(१) शब्दकोश : यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशांचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तिकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी-वाक्प्रचार संग्रह कोश इत्यादी.

(२) विश्वकोश : विश्वकोशाचे दोन भाग पडतात. (अ) सर्वसंग्राहक (उदा., एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी) (आ) विशिष्ट विषयपर कोश – हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदा., भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इत्यादी.

(३) कोशसदृश वाङ्मय : यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथनिर्मिती करतात. उदा., महाराष्ट्र जीवन खंड-१,२, शहर पुणे खंड-१,२, इयरबुक (मनोरमा, टाईम्स ऑफ इंडिया)

(४) सूचिवाङ्मय : ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. सूची सहसा अकारविल्हे असते. ती त्या-त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदा., मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची.

कोश आणि इतिहास : इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील, विश्वकोश वेगळे असतात. कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदा., महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश. जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे, ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यांस एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत बघायला मिळतो.

इतिहास विषयाशी संबंधित कोश : इतिहास या विषयातील कोशपरंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश (१८७६) हा आद्यकोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात ‘भरतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या, तसेच त्या त्या देशांतील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित…. जो इतिहास तो’ यात दिला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’चे तेवीस खंड आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल् व्हावे ही केतकरांची ज्ञानकोशरचनेमागील भूमिका होती. या खंडांमधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली आहे.

माहीत आहे का तुम्हांला?

पश्चिमेकडील देशांमध्ये (१) ‘नॅचरल हिस्ट्री’ (इ.स.पहिले शतक) हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश. (२) १८ व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा कोश महत्त्वाचा आहे. (३) एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इ.स.१७६७ मध्ये प्रसिद्ध झाला. हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. संस्कृत भाषेत निघंटू, धातुपाठ यांसारख्या शब्दकोशांची परंपरा प्राचीन आहे. मध्ययुगात महानुभाव पंथियांची कोशरचना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राज्यव्यवहारकोश हे महत्त्वाचे आहेत.

या पुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश होय. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘भारतीय चरित्रकोश मंडळा’ची स्थापना करून तिच्यातर्फेभारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (१९३२), भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश (१९३७), भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश (१९४६) असे तीन चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले. या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे.

माहीत आहे का तुम्हांला?

काही वैशिष्ट्यपूर्ण कोश

(१) संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास (लक्ष्मण दत्तात्रय जोशी), (२) क्रांतिकारकांचा चरित्रकोश (शं.रा.दाते) ज्यांत भारतातील सुमारे २५० क्रांतिकारकांची चरित्रे व छायाचित्रे आहेत. (३) स्वातंत्र्यसैनिक  : चरित्रकोश (न.र.फाटक) या कोशात स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्वकाळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काम केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती आहे.

स्थळ कोश : इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांत माहिती देणारे कोश आहेत.

(१) महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी (१४ वे शतक) या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते. लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्रीचक्रधरस्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भग्रंथ आहे.

(२) प्राचीन भारतीय स्थलकोश (१९६९) : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मीकी-रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फार्सी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे.

विश्वकोश : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले आहे. इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी यात आहे.

भारतीय संस्कृती कोश : महादेवशास्त्री जोशी यंाच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड तयार करण्यात आले. या कोशांमध्ये आसेतूहिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण-उत्सव सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आली आहे.

संज्ञा कोश : इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात. अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे

आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हांला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल.