९. गती व गतीचे प्रकार

आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाल होताना दिसते. हालचाल होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत असे आपण म्हणतो. वरील चित्रात कोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत. त्यांच्या गतीमध्ये कोणते फरक दिसतात त्याची वर्गात चर्चा करा.

गती

बसची वाट पहात बस थांब्यावर थांबले असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान झाल्याचे भासते. उदाहरणार्थ, रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडे. निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल, तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. वस्तूचे विस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते.

वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती म्हणतात.

गतीचे प्रकार

१. रेषीय गती

रेल्वेगाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून, एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल, तर त्या वस्तूची गती रेषीय गती आहे असे आपण म्हणतो.

खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून काय लक्षात येते ?

संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती सतत एकसारखी असते. त्यात थोडाही फरक दिसत नाही, परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही. मुलगी घसरगुंडीवरून वेगाने खाली येते कारण तिची गती सतत वाढत जाते.

सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती आहे. कारण गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही. घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ‘रेषीय असमान गती’ आहे असे दिसून येते. रेषीय गतीचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

रेषीय एकसमान गती

एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात.

रेषीय असमान गती

एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या  वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असे म्हणतात.

२. नैकरेषीय गती : एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस ‘नैकरेषीय गती’ म्हणतात. या गतीचे खालील प्रकार आहेत.

तुम्ही जेव्हा झोपाळ्यावर झोका घेता तेव्हा झोपाळ्याची हालचाल कशी होते ?

झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात. त्याचप्रमाणे घड्याळाचा फिरणारा लंबक, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा हीदेखील आंदोलित गतीची उदाहरणे आहेत.

घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरी गो राउंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. यांसारखी अनेक उदाहरणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो ज्यामध्ये वर्तुळाकार गती दिसून येते.

तुम्हांला वर्तुळाकार गतीची आणखी काही उदाहरणे सांगता येतील का? ती कोणती ?

आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणांवरून आपल्या असे लक्षात येते, की काही वस्तू या ठराविक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे, घड्याळाचा मिनिट काटा बरोबर ६० मिनिटांत एक फेरी पूर्ण करतो तर मेरी गो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करते. वस्तूंमधील या गतीला ‘नियतकालिक गती’ असे म्हणतात.

जरा डोके चालवा.

वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात.

ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात.

बागेतील फुलपाखराच्या मागे धावताना तुम्ही एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावता का ? नक्कीच नाही. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते. अशा गतीला ‘यादृच्छिक ‘गती’ म्हणतात. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गतीसुद्धा याच प्रकारची असते.

रांगणारे बाळ, भटकी जनावरे या सर्वांची गती यादृच्छिक असते.

चाल

एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे दोनशे किलोमीटर अंतर पाच तासांत पार करते, तर बस एका तासात किती अंतर पार करते ?

हे उदाहरण सोडवताना आपण पार केलेले अंतर आणि ते अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचे गुणोत्तर काढतो.

या गुणोत्तरावरून आपल्याला बसने एकक कालावधीत पार केलेले अंतर मिळते.