९. नकाशाप्रमाण

भौगोलिक स्पष्टीकरण

चित्रकार पेन्सिलने प्रथम समोरील दृश्याचे अंदाजे प्रमाण घेताे. त्यानंतर कागदावर त्यांचा आराखडा काढून घेतो. काढलेले चित्र हे प्रमाणबद्ध येण्यासाठी चित्रकार अशी कृती करत असतो. नकाशे तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. त्यावेळेस विशिष्ट प्रकारे प्रमाण निश्चित केले जाते. या प्रमाणाच्या आधारे आराखडे तयार करून पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा नकाशा तयार केला जातो.

पृथ्वी किंवा तिच्या ठरावीक भागांची माहिती आपण पृथ्वीगोल किंवा नकाशांच्या साह्याने घेऊ शकतो. नकाशा तयार करताना जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे कागदावर घेण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावी लागतात. त्यासाठी भूमिती व गणिती पद्धतींचा वापर केला जातो. ‘नकाशा प्रमाण’ या अंगाचा त्यासाठी उपयोग होतो. चला, नकाशाच्या या अंगाची नीट ओळख करून घेऊया.

नकाशाप्रमाणात नकाशातील दोन बिंदूंमधील अंतर व त्याच दोन बिंदूंमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा परस्परसंबंध ठेवावा लागतो. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हेच नकाशाप्रमाण असते. प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी जमिनीवरील अंतर माहीत असणे आवश्यक असते. ते सर्वेक्षण करताना मोजले जाते. अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण नकाशा तयार करताना घेतले जाते. नकाशा तयार केल्यावर या प्रमाणाची नोंद नकाशात करावी लागते. त्यामुळे नकाशाचे वाचन करणे, जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर समजणे सोईचे होते.

नकाशांमध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे तीन प्रकार आहेत.

(१) शब्दप्रमाण

(२) अंकप्रमाण/संख्याप्रमाण

(३) रेषाप्रमाण/रेखाप्रमाण/आलेखात्मक प्रमाण

आकृती ९.५ मध्ये नकाशा दिला आहे. वरील तिन्ही प्रकारचे नकाशाप्रमाण त्यात दाखवले आहेत. प्रमाण लिहिणाऱ्याच्या पद्धतीतील फरक नीट लक्षात घ्या.

(१) शब्दप्रमाण : ज्या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात, ते शब्दप्रमाण असते. उदा. १ सेमी = ६० किमी असे प्रमाण असेल तर या प्रमाणातील सेंटिमीटर हे एकक नकाशातील अंतर तर किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दर्शवते.

(२) अंकप्रमाण : प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते. उदा. १ : ६०,००,००० यामधील १ हे नकाशावरील अंतर आहे, तर ६०,००,००० हे जमिनीवरील अंतर आहे. ते नकाशावरील अंतराच्या ६०,००,००० पट आहे. या प्रमाणात केवळ अंकांचाच वापर केला जातो. अपूर्णांकात व्यक्त केलेल्या या प्रमाणास प्रतिनिधिक अपूर्णांक असेही म्हणतात. हे प्रमाण खालीलप्रमाणे दर्शवतात. १/६०,००,०००. या प्रमाणात परिमाणदर्शक शब्द लिहिला जात नाही. गुणोत्तराच्या डाव्या बाजूच्या अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक उजवीकडील अंकासाठी वापरायचे असते.

(३) रेषाप्रमाण : प्रमाणपट्टीच्या साहाय्याने नकाशावर रेषाप्रमाण दर्शवले जाते. नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या साह्याने मोजता येते.

मोजपट्टी उपलब्ध नसेल तेथे करकटक, साधी गवताची काडी किवं ा वक्ररेषेसाठी धाग्याचा वापर करूनही आपल्याला ठिकाणांमधील नकाशावरील अंतर प्रत्यक्ष मोजता येते. पुढील कृतीवरून हे तुमच्या लक्षात येईल.

रेषाप्रमाणाचे महत्त्व : अनेक वेळा मूळ नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो. त्या वेळी नकाशाप्रमाण बदलते. नकाशा लहान किंवा मोठा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांपैकी एक म्हणजे मूळ नकाशाचे छायाचित्र काढून नकाशे लहान किंवा मोठे केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने नकाशे लहान किंवा मोठे केल्यास त्यांवरील शब्दप्रमाण किंवा अंकप्रमाण नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाहीत. याउलट नकाशावर जर रेषाप्रमाण काढलेले असेल तर नकाशाच्या आकारमानानुसार रेषाप्रमाणही बदलते. बदललेल्या नकाशाचे प्रमाण योग्य राहते. अंकप्रमाण व शब्दप्रमाण यांचे आकारमान नव्या नकाशात बदलले तरीही त्याचे मूल्य मात्र बदलत नाही. म्हणूनच नकाशासंग्रह, भिंतीवरील नकाशा यांमध्ये रेषाप्रमाण काढले जाते.

बृहद्प्रमाण व लघुप्रमाण नकाशे : जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते बृहद्प्रमाण नकाशेअसतात. शहर, गाव, शेत, इत्यादी नकाशे ही बृहद्प्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत. सर्वसाधारणपणे १ : १०,००० पेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे बृहद्प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात.

गणितामध्ये आपण दोन अपूर्णांकांची तुलना करतो, तेव्हा ज्या अपूर्णांकातील छेदस्थानाची संख्या लहान असते, त्या अपूर्णांकाचे मूल्य जास्त असते. नकाशाप्रमाण अपूर्णांकात नसून गुणोत्तरात असते. म्हणून १ : १०,००० या अंकप्रमाणास बृहद्प्रमाण व १:५०,००० या अंकप्रमाणास लघुप्रमाण असे म्हणतात.

जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात ते लघुप्रमाण नकाशे असतात. म्हणजेच एखाद्या विस्तृत भूभागाची माहिती दाखवण्यासाठी लहान प्रमाण वापरून लघुप्रमाण नकाशे तयार केले जातात. नकाशासंग्रहातील नकाशे, जगाचा नकाशा ही लघुप्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत. ॲटलासमधील बहुतांश नकाशे हेसुद्धा लघुप्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत.

माहीत आहे का तुम्हांला ?

जगातील वेगवेगळ्यादेशांत मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात. त्यामुळे नकाशाचे वाचन करताना मर्यादा येऊ शकतात. म्हणून नकाशावर नेहमी अंकप्रमाण देणे उचित ठरते. अंकप्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे.