९. नात्याबाहेरचं नात

थंडीचा हळवा झंकार सर्वांगाला वेढून टाकणारा. रान, पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा. नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा. आकाश स्वच्छ. पुनवेच्या रेखीव छटांनी तर रात्रीचं अंतरंगच उजळून निघालेलं. जिकडे तिकडे लख्ख झगमगाट पसरलेला. रात्र काहीशी सामसूम; पण मन वेल्हाळ.

रात्र जशीजशी आगेकूच करू लागलेली तशी थंडीची लाटही वाढलेली. सारी थरथरती लाट मफलर, कानटाेपी आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झालेली. अशा कडाडत्या थंडीतही गावगल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली. तिथं चार-सहा जणांचा घोळका शेकोटी पेटवून असलेला. शेकोटीभोवती मक्याच्या कणसांचा भुसा पडलेला. चार-दोन गवऱ्याही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असलेल्या. शुभ्र चांदण्यांच्या प्रकाशकिरणांत त्यांच्या चाललेल्या भेंड्यांना रंग चढलेला. माझाही त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा. शेकोटीपासून दहा-पंधरा पावलांच्या अंतरावर असलेलं एक कडुलिंबाचं झाड चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होतं. वाऱ्याच्या झोतात हलणारी त्याची डहाळी मन आकर्षित करणारी. सारं भावस्पंदनावर झंकार उठवणारं. अशा चित्तवेधक झाडाच्या बुंध्याशी नजर वळताच आश्चर्याचा धक्का बसून गेलेला. कसली वळवळ म्हणावी? कोण असावं?

नकळत माझी पावलं बुंध्याच्या दिशेनं वळली. सोबतीला मित्रही. सर्वांनाच उत्सुकता लागलेली. काय असावं बरं तिथं एवढ्या कडक थंडीत ! पाहतो तर काय… एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू. अंगाचं गाठोडं करून पडलेलं. समोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हांला सुन्न करून गेला. थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणी पाणीच शिंपडलंय की काय असा भास झालेला. इवल्याशा जिवाला तशी थंडी असह्यच.

रात्रीचा दहा-साडेदहाचा सुमार. गाव तसं शांतच. अशा शांत वातावरणात त्या इवल्याशा पिल्लाची तीक्ष्ण नजर आमच्यावर खिळली. काय शोधत असावं ते पिल्लू आमच्यात? आधार तर मागत नसावं ! अगदी आधारच, म्हणूनच तर त्याचं नखशिखान्त न्याहाळणं चाललेलं. आमच्याकडे वळलेली त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या वेदनांना डोहात टाकणारी. अधूनमधून त्याचं चाललेलं कण्हणं, विराम शांततेचा भंग करणारं. त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली. त्यानं उठण्याचा प्रयत्न केला, पण पाय बधिर झालेले.

त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलंनकळत त्याच्या दिशेनं खेचली गेली. मला येताना पाहून त्याला एकदम हायसं वाटलं. आधार देण्यासाठी कुणीतरी धावून आल्याची त्याला जाणीव झाली. पाय उचलून त्यानं माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. माझ्या हाताचा त्याला स्पर्शहोताच त्याच्या डोळ्यांत लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखंवाटलं. का, कशी, पण त्याच्याविषयी माझ्या मनात स्नेहभावना उमलली. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याची हुडहुडी रोखण्यासाठी मी माझ्या गळ्यातला मफलर त्याच्या अंगावर टाकला. मफलरमुळे काहीशी ऊब मिळाल्यानं त्याचा चेहरा अधिकच खुलला. हुडहुडीही थांबली.

लहानग्या गाेंडस पिल्लाला हवा असलेला आधार मिळाला. त्याला अतिशय खुशी झाल्याचं जाणवलं. त्याच्या चोरट्या नजरेनं त्यानं मला पुन्हा न्याहाळलं. मलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून मी त्याला थेट माझ्या घरी घेऊन आलो. घरात माझा प्रवेश होताच घरातली मंडळी एकदम बावरली. ‘‘टाक ते पिल्लू खाली, टाक म्हणतो ना!’’ बाबांनी चांगलंच फटकारलं; पण मनात त्या पिल्लाविषयी रुखरुख. आपण पिल्लाला सोडून दिलं तर त्यानं कोठे जावं ? कोण देईल त्याला आधार ? कोण लळा लावील? असे कितीतरी प्रश्न मनात घिरट्या घालून गेले; पण त्याला असं अर्ध्यावर सोडून देणं अशक्य. पुन्हा बाबांचा मुक्या शब्दांचा मार निमूटपणे सोसला.

पिल्लूदिसायला कापसासारखं. तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक. त्याला पाहताच प्रेम जडावं इतकं अाकर्षक. त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का, म्हणून रात्रभर त्याला अंथरुणापाशी झोपवलं. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या उबेमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही अाणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं. ध्यानीमनी नसताना जुळून आलेलंनातं अगदी सुखावून गेलं. त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली, त्यामुळे त्याचं कण्हणंही थांबलं. शांत झोपही लागली. चिंबओल्या स्वप्नांचा फुलोर दोघांच्याही स्वप्नात बहरून आला.

सकाळच्या प्रसन्न हळदुल्या किरणांना साक्ष ठेवून त्याचा नामकरण सोहळा क्षणभरात आटोपला गेला. त्याच्या दांडग्या शरीराला अनुरूप असं त्याचं ‘डांग्या’ नाव ठेवलं. मित्रमंडळींनाही त्याचं नाव अावडलं. आता तोही सगळ्यांचा खास मित्रच बनला. प्रत्येकाला त्याचा लळा लागला. त्याची दुडुदुडु चाल भावणारीच. त्याचे तेजस्वी डोळे अगदी बोलके. त्याच्या मनातील गोष्टीला जणू उजाळा देणारे. अंगावर पडणारी त्याची झेप उत्साह द्विगुणित करणारी.

डांग्या लहानाचा मोठा होऊ लागला. वाढत्या वयासोबत त्याचा चेहरा अधिक प्रसन्न, शरीरयष्टी अधिक दणकट. त्याचं तरणंबांड शरीर येणाऱ्या- जाणाऱ्याच्या नजरेला भुरळ घालणारं. दोन्ही डोळ्यांच्या खाली असलेले पिवळसर पट्टे आणि मागच्या पायांच्या बोटांवर असलेले लालसोनेरी पट्टे सगळ्यांचं लक्ष आकर्षित करणारे.

डांग्याचं ओट्यावर पाय पसरून बसणं, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या डोळ्यांना मोहून टाकणारं. दूरवरून आलेली मित्रमंडळींची शीळ तर त्याची जणू पाठच झालेली. शिळेच्या रोखानं त्याचं दुडदुडणं लक्षवेधक. साऱ्या गावाला भुरळ घातलेली. त्याचं सोज्वळ रूप पाहून अाईबाबांनासुद्धा त्याचा नकळत लळा लागून गेला. डांग्यालाही त्यांच्याविषयी खूप जिव्हाळा. त्यानं जणू त्यांच्या थेट हृदयातच प्रवेश केला.

त्याच्या नावाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रत्येकाच्या डोळ्यांत त्याचं रूप नटलं. डांग्या अतिशय प्रामाणिक. घरादारात, शेतातसुद्धा त्याचा प्रामाणिकपणा जाणवलेला. शेतातील त्याची रखवाली अट्टल चोराची दातखिळी बसवणारी. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची बोबडी वळायची. पक्क्या हिमतीचा राखण्या मिळाला, म्हणून त्याच्या नावानं मनात घर केलेलं, जे कधीही विसरता येणार नाही. रात्रीची त्याची राखणदारी उभार डोळे तेवत ठेवणारी.

त्याची भारदस्त छाती पाहून झाडांवरील माकडांची अक्षरश: घाबरगुंडी उडायची. डांग्याचं नुसतं झाडाखाली बसून राहणंही माकडांच्या काळजात धस्स करणारं. एवढंच नव्हे, तर त्याच्या भीतीनं खारूताईसुद्धा पळायची. डांग्या असेपर्यंत तिलाही उपवास. इतर प्राण्यांनासुद्धा भीती वाटावी, असंच त्याचं शरीर अगडबंब.

कोण कशासाठी शेतात आला, याचा अंदाज समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांतून त्याला सहज आलेला असायचा. त्याची हुशारी, चपळता अगदी वाखाणण्याजोगी. एखाद्या वेळी माझी अनुपस्थिती कुणालाही न कळणारी, एवढी छाप डांग्यानं पाडलेली. विश्वस्तच म्हणावा त्याला. त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वानं थेट माझ्या हृदयात शिरकाव केला. एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान डोळ्यात झळकलेलं.

दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली; की मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून माझ्या येण्याची चाहूल घ्यायचा. मान उंचावून ओळखीचं रूप न्याहाळायचा. कानांची उघडझाप करून पुन्हा दुसऱ्या शिळेचा कानोसा घ्यायचा. एखाद्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जसं आपण पुढे जाऊन स्मितहास्य करतो, तसाच तोही माझ्या स्वागतासाठी दुडदुडत यायचा. अंगावर झेप घ्यायचा. त्याच्या तोंडानं हात चाटायचा. किती प्रेम एका प्राण्याकडून! ना नात्याचा, ना गोत्याचा. केवळ एक अनवधानानं, वेळप्रसंगानं घडून आलेलं नातं अविस्मरणीय होऊन गेलं.