९. पर्यटन, वाहतूक व संदेशवहन

पर्यटन :

                                           

ब्राझील : पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचेप्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. ‘ब्राझीलिया’ हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांच आकर्षण आहे. तसेच रिओ दी जनेरीओ आणि सावो पावलो यांसारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. देशातील अनेक भागांत पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा विकास होत आह

आकृती ९.१ मध्ये दाखवल्यानुसार २०१५ साली भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. तसे असले, तरीही पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी आहे. हेप्रामुख्यानेत्या त्या देशांची लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर अवलंबून आहे. त्यानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न व लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूपच जास्त आहे. (आकृती ९.२ पहा.) त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा ब्राझीलपेक्षा कमी दिसतो व या क्षेत्रातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त दिसते.

भारत : आकृती ९.१ मधील आलेखावरून लक्षात येते, की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे; परंतु ही वाढ २०१० पासून अधिक झालेली आढळते. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण आहे. परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादींसाठी येत असतात. पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतातही चालना दिली जात आहे. भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता देशातील अनेक भागांत पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी अनेक पर्यटनस्थळेनिर्माण केली जात आहेत.

ब्राझीलमधील वाहतूक :

ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. देशातील वाहतूक मार्गांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा रस्ते मार्गांचा अाहे. रस्त्यांची घनता पूर्वभागात केंद्रित झालेली आहे. पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यांमुळे रस्ते मार्गांचा विकास मर्यादित झाला आहे.

ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक केली जाते. या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्वीटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वांत लांब पल्ला (सुमारे ३७०० किमी) या मार्गाने गाठता येतो. पॅराना ही दक्षिणवाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होते. ब्राझीलमध्ये लोहमार्गांचा जास्त विकास झालेला नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली, तरी तिचा उपयोग मोजक्याच शहरांपुरता मर्यादित आहे. हवाई वाहतुकीचे योगदानही मर्यादित आहे.

भारतातील वाहतूक :

भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. रस्ते मार्गाने दर वर्षी सुमारे ८५% प्रवासी वाहतूक आणि ७०% मालवाहतूक होत असते. लोहमार्गांच्या विकासामुळे प्रवासी व मालवाहतूक सुलभ झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गांचे योगदान महत्त्वाचे आहे. भारतात लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे. भारताच्या मध्यभागात, ईशान्येकडील राज्यांत आणि राजस्थानमध्ये लोहमार्गांचे जाळेविरळ आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे दाट जाळे आहे. ज्या देशाचा विस्तार अधिक असतो, त्या देशांत दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गांचे महत्त्व जास्त असते.

जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. देशाच्या एकूण वाहतूक मार्गांत अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त १% आहे. यामध्ये नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे इत्यादींचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे ९५% व्यापार सागरी मार्गाने होतो.

आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय, देशाचा मुख्य भूभाग आणि बेटांदरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गांचा उपयोग होतो. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाईमार्गांचा वापरही वाढत आहे

ब्राझीलमधील संदेशवहन :

तुम्हांला माहीत आहेच की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. आकृती ९.१२ मध्ये ब्राझीलच्अति पूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील स्थाने दिली आहेत. या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा.या देशांच्या रेखावृत्तीय विस्तारामुळे असे लक्षात येते, की अति पूर्व आणि अति पश्चिम बिंदूंच्या वेळेतीलफरक १६८ मिनिटे (२ तास ४८ मिनिटे) आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. देशात वेगवेगळे ‘काल विभाग’ आहेत. या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या (GMT) अनुक्रमे २,३,४ आणि ५ तासांनी मागे आहेत. नकाशातील लाल रंगाची ठळक रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ (BRT) दर्शवते. ती ग्रीनिच वेळेच्या तीन तास मागे आहे.

ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास : ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. ब्राझीलमधील ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे. ब्राझीलमधील दक्षिणमध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित स्वरूपात झाला आहे.

प्रदेश रचना, विस्तीर्ण आकार, लोकवस्ती विरहित प्रदेश, घनदाट वने इत्यादी अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होते. अलीकडील काही वर्षात ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर वाढला असून दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अवकाशतंत्राच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे.

भारतातील संदेशवहन :

भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. भारतातील अति पूर्व व अति पश्चिम टोकांवरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक सुमारे १२० मिनिटांचा आहे. परंतु भारतात एकच प्रमाणवेळ मानली जाते. भारतीय प्रमाणवेळेसाठी (IST) ८२° ३०’ पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जाते. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळेहे क्षेत्र अधिक वेगानेविस्तारत आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे

माहीत आहे का तुम्हांला ?

इस्रो (ISRO) भारतीय अवकाश संशोधन संस्थाः भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

ब्राझीलमध्ये ‘ब्राझीलियन अवकाश एजन्सी’च्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जात आहे

प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने या देशावर अधिक अवलंबून होता, परंतु अलीकडे चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचे सहकार्य घेत आहे.