९. मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यरक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. या सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला ‘मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम’ असे म्हणतात. इ.स.१६८२ मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला. तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले. हा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे. आपण या पाठात या स्वातंत्र्यसंग्रामाचा अभ्यास करणार आहोत.

छत्रपती संभाजी महाराज: संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. त्या वेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता. अशा स्थितीत औरंगजेब बादशाहाचा मुलगा शाहजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले. हे बंड बादशाहाने मोडून काढले. मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशाह स्वतः इ.स.१६८२ मध्ये दक्षिणेत आला. त्याच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. त्याने जंजिऱ्याच्या सिद्दीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. पोर्तुगिजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले. यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला.

 संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे पहिले पर्व होय. महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते. वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले होते. युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशाहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. त्यांच्या युद्धकौशल्याचे वर्णन करताना त्या वेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, ‘‘हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे….’’

संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे, असे त्याचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या युद्धकौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशांत स्वाऱ्या करत होत्या. मराठ्यांचा नाशिकजवळचा रामसेजचा किल्ला तर बादशाहच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता. त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले व प्रतिज्ञा केली की, “या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही.” संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते.

सिद्दीविरुद्धची मोहीम : जंजिऱ्याचा सिद्दी मराठी मुलखाला उपद्रव देत असे. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे. ‘घरात जैसा उंदीर, तैसा राज्यास सिद्दी’ असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. संभाजी महाराजांनी इ.स.१६८२ मध्ये त्याच्याविरुद्ध मोहीम उघडली. त्यांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडिमार केला.

परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले.

पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम : गोव्याच्या पोर्तुगिजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी इ.स. १६८३ मध्ये ■ पोर्तुगिजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगिजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर घायाळ झाला. त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले.

आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट:

औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते. त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली.

या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली. त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली. त्यांच्या प्रदेशावर चोहोबाजूंनी हल्ले चढवले. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला. त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली.

संभाजी महाराजांचा मुलकी कारभार : संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी

शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. महाराणी येसूबाईंना राज्यकाराभाचे अधिकार दिले. त्यांचा स्वतःचा शिक्का करून दिला. शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी अापल्या कारकिर्दीत पुढे चालवले.

संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार ‘बुधभूषण’ या ग्रंथात मांडले.

संभाजी महाराजांचा मृत्यू : औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकर्रबखान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकर्रबखानास कळली. तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. बादशाहापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. मग बादशाहाच्या हुकमाने ११ मार्च १६८९ रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला.

छत्रपती राजाराम महाराज : राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होत. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार, असे औरंगजेबला वाटू लागले. म्हणून त्याने रायगडला वेढा घालण्यासाठी झुल्फिकारखानाला पाठवले. त्या वेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही, असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. त्यानुसार, राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे, असे ठरले. तसेच, महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरणही ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्यप्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थत्यागाचे उदाहरण होय. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले.

राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण

५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला अभेदय होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहचले.

मराठ्यांच्या हालचाली : मुघल रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर १६८९ मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद केले. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती.

मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले. मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारांस दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधनसामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता.

जिंजीला वेढा : रायगड ताब्यात घेतल्यावर बादशाहाने झुल्फिकारखानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ आठ वर्षे निकराने लढवला. संताजी व धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले. त्यानंतर झुल्फिकारखानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला.

राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वऱ्हाड, बागलाण या प्रदेशांवर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर तयार केले. त्यांच्यात स्वराज्यरक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडली. परंतु हे सर्व घडत असताना २ मार्च १७०० मध्ये राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावर निधन झाले.

राजाराम महाराज विचारी आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणले. त्यांची एकजूट केली व त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ११ वर्षे त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वांत मोठी कामगिरी होय.

रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना ‘स्थिरबुद्धी’ या विशेषणाचा उपयोग केला आहे. त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ वाटतो.

करून पहा.

तुमच्या परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची मुलाखत घ्या.

महाराणी ताराबाई छत्रपती : राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता. पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या.

मुघल इतिहासकार खाफीखान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दांत केले आहे, “ती (ताराबाई) बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या

हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. ”

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या साहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली, तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्यप्रदेश, गुजरात या प्रदेशांत धडक मारली. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खूण होती.

महाराणी ताराबाईंनी सात वर्षे संघर्ष केला. राज्य राखले. सगळा कारभार एकहाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले. सिरोंज, मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठे सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले. खाफिखान लिहितो, “राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली तीत तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या

व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली. ”

माहीत आहे का तुम्हांला ?

ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना ‘शिवभारत’कार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त याने म्हटले आहे,

ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली । दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी । रामराणी भद्रकाली । रणरंगी क्रुद्ध झाली । प्रयत्नाची वेळ आली । मुगल हो सांभाळा ।।

अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला. मराठ्यांच्या या आक्रमक चढायांमुळे औरंगजेब हताश झाला. सतत पंचवीस वर्षे मुघल-मराठे संघर्ष चालू होता. मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही. अशा परिस्थितीत औरंगजेब बादशाहाचा इ.स.१७०७ मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम समाप्त झाला.

मराठ्यांचा हा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. त्यात मराठ्यांचा विजय झाला. इतकेच नव्हे तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे अग्रेसर राहिले. दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला व रक्षणही केले. त्यामुळे अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठांत पाहणार आहोत