विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व ह्या जगामाजीं;
न दिसे एकहि वस्तूविद्येनेंही असाध्य आहे जी.।।१।।
देउनि किंवा भोगुनि उणें न होतांसदैव वाढतसे
ऐसें एकच विद्या-धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे. ।।२।।
नानाविध रत्नांची, कनकांचीं असति भूषणें फार;
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार. ।।३।।
या साऱ्या भुवनीं हित-कर विद्येसारखा सखा नाहीं;
अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांही. ।।४।।
गुरुपरि उपदेश करी, संकट-समयीं उपायही सुचवी,
चिंतित फळ देउनियां कल्पतरूपरि मनोरथां पुरवी. ।।५।।
यापरि सकल सुखें जी देई, दु:खें समस्त जी वारी,
त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी. ।।६।।