९. व्यापार

भौगोलिक स्पष्टीकरण

वरील जमा केलेल्या माहितीवरून तुमच्या असे लक्षात येईल, की आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानांमधून, बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणांहून खरेदी करतो. बहुतेक सर्व विक्रेत े स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत. त्या वस्तूते कोठून तरी आणतात. या सगळ्याच वस्तू आपल्या परिसरात तयार होतात असे नाही. या वस्तू अनेक दूरदूरच्या ठिकाणी तयार होतात. घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणांहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्यांकडे व पुढे आपल्यापर्यंत पोहोचतात.

दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो. खरेदी करतो म्हणजे आपण मागणी करतो.

या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. वस्तूंचा पुरवठा उत्पादक करतो, म्हणजेच त्या घाऊक व्यापाऱ्याला विकताे.

अशाप्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात.

ग्राहक व विक्रेत े वस्तूंची खरेदी-विक्री किंवा देवाणघेवाण करतात. याला व्यापार असे संबोधतात.

व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते.

कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशांदरम्यान व्यापार होणे गरजेचे असते. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूंचे उत्पादन होत असते.

ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते, तेथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो. अशाप्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशांकडे वस्तूंचा मागणीनुसार पुरवठा होत असतो. उदा., जम्मू-काश्मीरमध्ये होणारे सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यांत मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जाते.

भौगोलिक स्पष्टीकरण

वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी-विक्री होते, तेव्हा त्यास दृश्य व्यापार म्हणतात; परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते, तेव्हा त्यास अदृश्य व्यापार म्हणतात.

व्यापाराचे प्रकार :

(१) वस्तूच्या प्रमाणानुसार : वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे दोन प्रकार पडतात.

घाऊक व्यापार : व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते. खरेदी केलेल्या मालाची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार. कारखानदार, शेतकरी इत्यादींकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात उदा., आंब्यांचे किंवा संत्र्यांचे बागाइतदार, बागेतील संपूर्ण उत्पादन घाऊक व्यापाऱ्याला विकतात.

किरकोळ व्यापार : मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात. अशा व्यापारास किरकोळ व्यापार म्हणतात. यामध्ये वस्तूंचे प्रमाण कमी असते. उदा., किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईमधील भाजी विक्रेते इत्यादी.

(२) प्रदेश विस्तारानुसार : मालाची खरेदी-विक्री विविध स्तरांवर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात.

देशांतर्गत व्यापार/अंतर्गत व्यापार : एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो. लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर व्यापारावर होत असतो. भारतात भौगोलिक घटकांतील विविधता आणि जास्त लोकसंख्या, या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल, तर व्यापारही जास्त असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो.

आंतरराष्ट्रीय व्यापार : आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. काही देशांमध्येविशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते. ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते. यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते.

आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार दोनपेक्षा अधिक देशांदरम्यान होतो, तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात.

काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करतात. उदा., सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशांमध्ये होणारे खनिज तेल उत्पादन; कॅनडा, संयुक्त संस्थाने इत्यादी देशांतील गहू उत्पादन. हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना पुरवले जाते.

आयात व निर्यात : आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तूकिंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो, तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते, तेव्हा त्या क्रियेला निर्यात असे म्हणतात.

व्यापार संतुलन :

एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

  • जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना :

आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार दोन किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. देशादेशांमधील परस्परांचे राजनैतिक संबंध यांमुळेसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतात. काही वेळेस व्यापारप्रक्रियेतील अडथळ्यांमुळे परस्परसंबंध व सलोख्यावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापारप्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी, या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धी व सुलभतेसाठी काम करतात. त्यातील काही आर्थिक संघटनांची माहिती पुढील कोष्टकात दिली आहे.

विपणन :

कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. मालाची गुणवत्ता, त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकापुढे कशाप्रकारे सादर केला जातो, यांवरून मालाची किंमत ठरते. धोंडिबाच्या शेतमालाबाबत याची कमतरता होती, ती धोंडिबाच्या मुलाने वेळीच ओळखली आणि त्यात बदल केले. अशाच प्रकारे औद्योगिक उत्पादनात किंवा शेतमालासाठी उपाययोजना केल्यास ग्राहकांच्या नजरेत मालाची प्रत वाढते, त्यामुळे मालाला किंमत तर मिळतेच; पण अशा मालाची मागणीदेखील वाढू लागते.

उत्पादनांची आकर्षक जाहिरात पाहिल्यास, उत्पादनांविषयी चौकशी केल्यावर किंवा बाजारात बघितल्यावर लक्षात येते, की ही उत्पादने आपल्या उपयोगाची आहेत, म्हणून ती विकत घेतली जातात. हे सर्व विपणनामुळे शक्य होते. योग्य विपणनातूनच व्यापार वाढीस लागतो.

विपणनाचे महत्त्व ः

आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनांचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. उत्पादनाचे विक्रीमूल्यदेखील वाढते. सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात, म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे.

ग्राहकाला गरज आहे, अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे, ग्राहकांना उत्पादनांकडे आकर्षित करणे व खरेदीसाठी प्रवृत्त करणे, हे या मागील उद्देश असतात.

माहिती तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सारे जग हे एक मोठी बाजारपेठ बनले आहे. आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशांतील उत्पादनांची माहिती उपलब्ध होत आहे. यातून ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होतात. आंतरजालाच्या सुविधेमुळे ‘ऑनलाइन ट्रेडिंग’, ‘ई-मार्केटिंग’ यांसारखी तंत्रे ग्राहक वापरत आहेत.

उत्पादनाची जाहिरात करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्ण विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे, यामुळे अनेक वेळा जाहिराती आपली विश्वासार्हता गमावताना दिसतात, म्हणून जाहिरात करताना योग्य नीतिनियम पाळणे आवश्यक अाहे. ग्राहकाने देखील अशा जाहिरातींपासून सावध राहणे आवश्यक अाहे. ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केलेला आहे.

आपली गरज ओळखून उत्पादने रास्त दराने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असणे आवश्यक असते.