९.१ धातूचा वापर
९.२ चाकावर घडवलेली भांडी
९. ३ व्यापार आणि वाहतूक
९.४ नगरांचा उदय आणि लिपी
९.५ नागरी समाजव्यवस्था
९.१ धातूचा वापर
माणसाने सर्वप्रथम वापरात आणलेला धातू कोणता याबद्दल आपल्या मनात खूप कुतूहल असते. युरोपमधील संग्रहालयांमध्ये जमा झालेल्या पुराणवस्तूंच्या संग्रहांचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉमसेन नावाच्या अभ्यासकाने ‘त्रियुग पद्धती’ नावाची पद्धत अमलात आणली. त्याने त्या वस्तूंची वर्गवारी तीन गटांमध्ये केली.
१. दगडाची हत्यारे – अश्मयुग
२. तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुग
३. लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू लोहयुग
ही वर्गवारी ठरवताना दगडाची हत्यारे आधीच्या काळातील, तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा आणि लोखंडाची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वांत नंतरचा, हे थॉमसेनने सप्रमाण दाखवून दिले. त्यानुसार अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेली. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी एक समजूत तयार झाली, की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय.
प्रत्यक्षात मात्र सोने हा वापरात आलेला पहिला धातू आहे. सोने निसर्गतः अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे, अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता. सोन्यानंतर माणसाला अशा एका धातूचा शोध लागला, की ज्यापासून त्याला हत्यारे, अवजारे बनवता येणे शक्य झाले. तो धातू म्हणजे ‘तांबे’. ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली, त्या काळाला ‘ताम्रयुग’ असे म्हटले जाते.
९.२ चाकावर घडवलेली भांडी
ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता. याच काळात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक. हे सर्वसाधारणपणे मान्य केले जाते, की चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला. वाहनासाठी चाकाचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला असावा.
९.३ व्यापार आणि वाहतूक
भांडी चाकावर घडवायला लागल्यानंतर त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले. या काळात सुबक आकारांची आणि सुंदर नक्षीची रंगीत भांडी घडवली जाऊ लागली. ही भांडी आणि इतर विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर कामाच्या सोईसाठी गावात एके ठिकाणी वस्ती करू लागले. आपण असे म्हणू शकतो, की गावामध्ये कुशल कारागिरांच्या वस्तीचा आणि वस्तूंच्या उत्पादन केंद्रांचा एक खास विभागच तयार झाला, परंतु हे ज्या गावांमध्ये कच्चा माल सहज उपलब्ध होत होता आणि जी गावे व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोईची होती, त्या गावांमध्येच घडले. त्या गावांचा विस्तार झाला.
वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यांनतर व्यापारातही वाढ झाली. त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीत बदल होणे गरजेचे होते.. याच काळात चाकांच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली.
९.४ नगरांचा उदय आणि लिपी
दूरवर पसरलेला व्यापार, मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनांची केंद्रे, यांमुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एके ठिकाणी आले. नगरे उदयाला आली. वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले.
सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होताच. सांकेतिक खुणा असलेली खापरे उत्खननात मोठ्या संख्येने मिळतात. व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा बाढता व्याप, यांसारख्या कारणांमुळे आधीपासून वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांमध्ये सुधारणा केल्या गेल्या. त्यांच्यावर संस्करण केले गेले. अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली.
९.५ नागरी समाजव्यवस्था
व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतींचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते, हे खरे. परंतु त्या नागरी संस्कृतींचा पाया नवाश्मयुगातील कृकृत आधारलेला होता. संस्कृती रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातात एकवटले. पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद, ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतींची हो सुरुवात होती. या संस्कृतींची सविस्तर माहिती आपण पुढील पाठामध्ये घेऊ.