1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता (Biodiversity and need of classification)

मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांत अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेले दिसतात.

2011 च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटांत विभागणी व्हायला हवी, अशी गरज भासली. सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले.

सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.

 रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर (1920-1980) हे अमेरिकन परिस्थितीकी तज्ज्ञ (Ecologist) होऊन गेले. त्यांनी इ.स. 1969 मध्ये सजीवांची 5 गटांत विभागणी केली.

वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले.

 1. पेशीची जटिलता (Complexity of cell structure) : आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी
 2. सजीवांचा प्रकार / जटिलता (Complexity of organisms) :एकपेशीय किंवा बहुपेशीय
 3. पोषणाचा प्रकार (Mode of nutrition): वनस्पती – स्वयंपोषी (प्रकाश संश्लेषण), कवके – परपोषी (मृतावशेषातून अन्नशोषण), प्राणी- परपोषी (भक्षण)
 4. जीवनपद्धती (Life style) : उत्पादक – वनस्पती, भक्षक – प्राणी, विघटक – कवके
 5. वर्गानुवंशिक संबंध (Phylogenetic relationship) : आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय

सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण (Classification of microbes)

पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची पुढीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे.

जीवाणू (Bacteria) :

(आकार – 1 mm ते 10 mm)

 1. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती (Colonies) बनवतात.
 2. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशीभित्तिका असते.
 3. प्रजनन बहुधा द्विखंडीभवनाने (एका पेशीचे दोन भाग होऊन) होते.
 4. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटांत संख्येने दुप्पट होऊ शकतात.

आदिजीव (Protozoa) : (आकार – सुमारे200 mm )

 1. माती, गोडे पाणी व समुद्रात अाढळतात, काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात.
 2. दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव.
 3. प्रोटोझुआंच्या पेशीरचना, हालचालींचे अवयव, पोषणपद्धती यांत विविधता आढळते.
 4. प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. उदा. अमिबा, पॅरामेशिअम – गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. एन्टामिबा हिस्टोलिटिका – आमांश होण्यास कारणीभूत प्लाज्मोडिअम व्हायवॅक्स – मलेरिया (हिवताप) होण्यास कारणीभूत. युग्लीना – स्वयंपोषी

कवके (Fungi) : (आकार – सुमारे 10 mm ते 100 mm)

 1. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थयांमध्ये आढळतात.

    2.दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात.

 1. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्नशोषण करतात.
 2. प्रजनन लैंगिक पद्‍धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. उदा. यीस्ट, कॅन्डीडा, आळंबी (मशरूम).

शैवाले (Algae) : (आकार – सुमारे 10 mm ते 100 mm)

 1. पाण्यात वाढतात.
 2. दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव
 3. पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करतात. उदा. क्लोरेल्ला, क्लॅमिडोमोनास. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात.

 विषाणू (Virus) : (आकार – सुमारे 10 nm ते 100 nm)

विषाणूंना साामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव-निर्जिवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात (Microbiology) केला जातो.

 1. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात.
 2. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA (डीऑक्सीरायबो न्युक्लिक आम्ल) किंवा RNA (रायबो न्युक्लिक आम्ल) पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.
 3. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात.
 4. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात.