10. आपत्ती व्यवस्थापन

मागील इयत्तेत आपण मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती हे आपत्तींचे दोन प्रकार अभ्यासले अाहेत. वरील बातम्यांमधील आपत्तींचे या प्रकारांत वर्गीकरण करा. काही आपत्ती आपण टाळू शकतो, तर काही आपत्तींमध्ये दक्षता घेणे आवश्यक असते. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती ह्या एकमेकांशी संबंधित असतात. हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, वादळे इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती उद्‌भवतात. अशा नैसर्गिक आपत्तींत जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्याला जबाबदार कोण? त्यासाठी आपण काय करू शकतो?

दुष्काळ (Famine)

अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्‌भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ. दुष्काळाचे सर्वसाधारणपणे सौम्य दुष्काळ आणि तीव्र दुष्काळ असे वर्गीकरण केले जाते. दुष्काळाचे प्रमुख कारण नैसर्गिक असले, तरी काही मानवी कृतींमुळे, तर काही नैसर्गिक कृतींमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते.

दुष्काळाची कारणे

अवर्षण, अतिवृष्टी व पूर, पुरात पिके वाहून जाणे किंवा पिकांचे नुकसान होणे, तापमानांतील बदल, वादळे, थंड हवा, धुके असे पर्यावरणातील बदल, तसेच पिकांवर पडणारी कीड, रोग, टोळधाड, उंदीर व घुशी इत्यादी प्राण्यांकडून होणारा पिकांचा नाश, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती इत्यादी दुष्काळाची काही कारणे आहेत. त्यांपैकी अवर्षण हे दुष्काळाचे प्रमुख कारण आहे. दुष्काळाच्या मानवी कारणांमध्ये युद्ध, अंतर्गत अशांतता, वाहतुकीच्या मार्गांचा अभाव, लोकसंख्येची बेसुमार वाढ या बाबींचा समावेश होतो.

जगात विविध प्रदेशांत तीव्र दुष्काळ पडून त्यात प्राणहानी झाल्याच्या नोंदी आहेत. आशिया हा जगातील प्रमुख दुष्काळग्रस्त खंड ठरला आहे. बहुतांश दुष्काळ अवर्षणप्रवण व पूरग्रस्त प्रदेशांत पडलेले आहेत. जगात जे भीषण दुष्काळ पडले त्यांत भारत व चीनमधील दुष्काळ प्रमुख आहेत.

आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का?

  1. पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने पाण्याचा तुटवडा वाढत आहे.
    2. हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांच्या वापरामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाले आहे.
    3. अमर्याद पाणी उपसा करणे.
    4. जमिनीची धूप होणे.
    5. पाण्याचा गैरवापर करणे.

ढगफुटी (Cloudburst)

काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. परिणामी त्या ढगांत वाफेचा अधिक साठा होतो. शीघ्र संघनन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलिमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो याला ढगफुटी म्हणतात.

महापूर (Flood)

मागील इयत्तेमध्ये आपण महापूर व महापुराचे परिणाम अभ्यासले आहेत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रामध्ये आलेल्या विविध ठिकाणच्या महापुरांबद्दल माहिती मिळवा.

महापुरावर संरक्षणात्मक उपाययोजना

  1. डोंगराळ प्रदेशांत लहान धरणे बांधणे.
    2. पाझर तलावाची निर्मिती करणे.
    3. नद्यांचे पात्र कृत्रिमरीत्या सरळ करणे.
    4. नवीन जंगल लागवड करणे.
    5. नद्या जोडणे.

वीज पडणे (Lightning)

स्थितिक विद्युत या पाठामध्ये तुम्ही वीजनिर्मिती व वीज पडणे यांविषयी माहिती घेतलेली आहे. या पाठात आपण विजेची आणखी काही वैशिष्ट्ये व विजेपासून बचाव करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत.

ज्वालामुखी (Volcano)

ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात.त्यामुळे काहीवेळा भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्थभूकवचाकडे ढकलले जातात. हे पदार्थभूकवचाबाहेर पडून त्यांचा पृष्ठभागावर उद्रेक झाला व ते वाहू लागले की त्यास ‘ज्वालामुखी’ म्हणतात.

ज्वालामुखीमुळे काय होते?

  1. शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात, त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते.
    2. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते.
    3. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो.
    4. उष्ण वायूमुळे तापमान वाढते.
    5. उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात.

ज्वालामुखी जमिनीवर होतात तसेच समुद्रातही होतात. जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात, तेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतूनही बाहेर पडतात. समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते. ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे, उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणे किंवा त्याचे नियंत्रण करणे शक्य नसते, मात्र त्याचे भाकीत करणे व त्यानुसार तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य झाले आहे.

त्सुनामी (Tsunami)

जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते, परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते.

 महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना ‘त्सुनामी लाटा’ म्हणतात. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट.

त्सुनामीचे विघातक परिणाम

  1. इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात.
    2. जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते.
    3. किनाऱ्याजवळील होड्या व जहाजे यांची हानी होते.
    4. झाडे मुळांपासून उन्मळून पडतात. माेठ्या प्रमाणावर भूस्खलन होते.
    5. किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होऊन दलदलीचे प्रदेश निर्माण होतात.
    6. वाहतुकीस अडथळे निर्माण होतात.
    7. समुद्राशी संबंधित व्यवसाय/उद्योगधंदे यांवर विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते.
    8. बंदराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

वादळे (Storms)

मागील इयत्तेत आपण वादळनिर्मिती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती घेतली आहे. समजा, तुम्ही एखाद्या वादळात अडकलात तर काय कराल?