स्नायुसंस्था (Muscular system)
तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून पहा. काय लक्षात आले? दंडाचा भाग तुम्हांला टणक जाणवला का? हा मांसल भाग म्हणजे स्नायू होय. शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूंमुळे प्राप्त होते. स्नायू(Muscle) म्हणजे गरजेनुसार आकुंचन-शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट.
स्नायू हाडांना स्नायुबंधांनी (Tendon) घट्ट जोडलेला असतो. स्नायू आकुंचन पावला, की सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात.
पापणी लवण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालींपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळेच घडतात. बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो. स्नायू हे शरीराच्या सर्वभागांत असतात. माणसाच्या शरीराच्या वाढीबरोबरच स्नायूंचीही वाढ होत असते.
- ऐच्छिक स्नायू (Voluntary Muscle) ः हातांनी काम करणे, चालणे, अन्नपदार्थ खाणे अशी कामे अापल्या इच्छेवर अवलंबून असतात. अशा कामांसाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ, हात आणि पाय या अवयवांत ऐच्छिक स्नायू असतात.
- अनैच्छिक स्नायू (Involuntary Muscle) : श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या अापल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठरावीक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात.
शरीरातील कोणकोणत्या अवयवांमध्ये ऐच्छिक व अनैच्छिक स्नायू आहेत? त्यांचा शोध घेऊन यादी तयार करा.
स्नायूंचे प्रकार (Types of muscles)
- अस्थी स्नायू (Skeletal muscles) या स्नायूंची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदा., हातांचे, पायांचे स्नायू. यांची हालचाल ऐच्छिक असते. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात.
- हृदयाचे स्नायू (Cardiac muscles) हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते. हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास ७० वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते.
- मृदू स्नायू (Smooth muscles) शरीरातील इतर आंतरेंद्रियांमध्ये हे स्नायू आढळतात. उदाहरणार्थ, जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे स्नायू. यांची हालचाल अनैच्छिक असते. हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते. या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या नकळत होत असतात.
वरील तीनही कृती करताना हाताच्या कोणत्या भागातील स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण झाले? आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करतात. जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते, तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात. अशा रीतीने विविध शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात.
आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू (Biceps) व खालच्या बाजूला असलेल्या स्नायूला त्रिशिरस्क स्नायू (Triceps) असे म्हणतात.
पचनसंस्था (Digestive system)
खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो. अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे नऊ मीटर असते. त्यात प्रामुख्याने मुख/तोंड, ग्रसनी, ग्रासिका, जठर/अमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठरावीक ठिकाणी जोडलेल्या असतात. पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिय वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात. आता आपण पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये पाहूया.
दात (Teeth)
अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. दातांचे मुख्यत्वे पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार असून प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. प्रत्येक दातावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. एनॅमल हे कॅल्शिअमच्या क्षारांपासून बनलेले असते.
लाळेमध्ये टायलीन (अमायलेज) नावाचे विकर असते. यामुळे स्टार्चचे (पिष्टमय पदार्थ) रूपांतर माल्टोज या शर्करेत होते.