13. बदल : भौतिक व रासायनिक

झाडावरून फळ खाली पडणे, लोखंड गंजणे, पाऊस पडणे, विजेचा दिवा लावणे, भाजी चिरणे यांचे दोन गटांत वर्गीकरण करताना तुम्ही कोणत्या बाबी विचारात घ्याल?

मागील इयत्तेमध्ये आपण काही पाठांमध्ये बदलांची उदाहरणे अभ्यासली आहेत. जसे, फळ पिकणे, दूध नासणे हे बदल निसर्गत:च घडून येतात. त्यांना नैसर्गिक बदल (Natural change) असे म्हणतात. अशा काही नैसर्गिक बदलांची इतर उदाहरणे कोणती आहेत? सभोवतालच्या पदार्थांमध्ये घडणारे कोणकोणते बदल तुम्ही पाहिले आहेत? या पाठामध्ये आपण बदलांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पेन्सिलीला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते, म्हणून त्यांना उपयुक्त बदल म्हणतात, तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहचवणाऱ्या बदलांना हानिकारक बदल म्हणतात.

विचार करा.

तुम्ही यादी केलेल्या निसर्गनिर्मित व मानवनिर्मित बदलांचे उपयुक्त व हानिकारक बदल असे वर्गीकरण करता येईल का? आतापर्यंत आपण बदलांचे काही प्रकार अभ्यासले आहेत. त्यांपैकी फुगा फुटणे व फळ पिकणे या दोन बदलांचा कालावधीच्या दृष्टीने विचार केला, तर आपल्याला काय सांगता येईल? फुगा फुटण्याचा कालावधी हा फळ पिकण्याच्या कालावधीपेक्षा कितीतरी कमी आहे. जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र होणारे बदल म्हणतात. तर फळ पिकण्याची क्रिया हा सावकाश होणारा बदल आहे.

मेण वितळवून पुन्हा मेण मिळवणे, हे आपण पुन्हा पुन्हा करून पाहू शकतो. म्हणून पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात, परंतु पिकलेल्या आंब्याचे पुन्हा कैरीत रूपांतर होत नाही. लाकूड जाळले की राखेपासून पुन्हा लाकूड मिळत नाही.

वरील उदाहरणांचा विचार करता काही बदल हे ठरावीक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशा बदलांना आवर्ती बदल म्हणतात. याउलट एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. तो झालाच तर त्या दोन्हींमधील कालावधी एकसारखा नसतो. अशा बदलांना अनावर्ती बदल म्हणतात.

  1. शेजारील चित्रामध्ये दिसणारे कोणते बदल हे तात्पुरते आहेत?
    2. कोणते बदल हे कायमस्वरूपी आहेत?
    3. कोणत्या बदलांमध्ये मूळ पदार्थ बदलला?
    4. कोणत्या बदलांमध्ये मूळ पदार्थ तसाच राहिला?
    5. कोणत्या बदलांमध्येनवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झाला?

वरील काही बदलांच्या उदाहरणांचा विचार केला, तर काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहे तसेच राहिले. म्हणजेच त्यांचे संघटन कायम राहिले. कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही. अशा बदलास भौतिक बदल (Physical change) असेम्हणतात.

जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांत होते अशा बदलास रासायनिक बदल (Chemical change) असे म्हणतात.

द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन. कपडे वाळणे, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे हे बाष्पीभवनाने शक्य होते. जलचक्रामध्ये आपण विविध क्रिया अभ्यासल्या आहेत, त्या कोणत्या? त्या क्रिया होत असताना पाण्याचे मूळ गुणधर्म बदलले का? मागील इयत्तांमध्ये आपण विरघळणे, उत्कलन, विलयन या क्रियांचा अभ्यास केला आहे. या सर्वक्रिया ही भौतिक बदलांची उदाहरणे आहेत.

साहित्य ः बाष्पनपात्र, साखर, बर्नर, तिवई इत्यादी.

कृती ः बाष्पनपात्रामध्ये साखर घ्या. बाष्पनपात्र तिवईवर ठेवा व उष्णता द्या. साखरेमध्ये होणाऱ्या विविध बदलांचे निरीक्षण करा. बाष्पनपात्राच्या तळाशी काळपट पदार्थदिसू लागला, की उष्णता देणे थांबवा. वरील कृतीमधून झालेला बदल हा कोणत्या प्रकारचा बदल आहे?

क्षरण (Corrosion)

 लोखंडाची वस्तूगंजते म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो, तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो. या क्रियेस धातूंचे क्षरण म्हणतात. क्षरणामुळे वस्तू कमकुवत होतात. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांमुळे क्षरण होते.