15. सजीवांमधील जीवनप्रक्रिया

परिवहन (Transportation)

परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्येसंश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहचवला जातो.

वनस्पतींमधील परिवहन (Transportation in Plants)

बहुसंख्य प्राणी हालचाल करतात परंतुवनस्पती स्थिर असतात. त्यांच्या शरीरात अनेक मृतपेशी असतात. प्राण्यांच्या तुलनेत वनस्पतींना ऊर्जेची गरज कमी असते. वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, मँगनीज, सोडियम यांसारख्या अकार्बनी पदार्थांची आवश्यकता असते. जमीन हा या पदार्थांचा सर्वात जवळचा आणि समृद्ध असा स्रोत आहे. वनस्पतींची मुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्यांचे परिवहन करतात. विशिष्ट प्रकारच्या ऊती हे कार्य करतात. जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात. वनस्पतींचे सर्व भाग या संवहनी ऊतींशी जोडलेले असतात.

वनस्पतींमधील पाण्याचे वहन
मूलदाब (Root Pressure)

मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. संहतीमध्येअसलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात. यामुळे या पेशी ताठर होतात. त्यामुळे त्यांच्या लगतच्या पेशीवरत्या दाब निर्माणकरतात. यालाच मूलदाबअसे म्हणतात. यादाबामुळे पाणीआणि खनिजे मुळांच्या जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात. या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो, जो सातत्याने पुढे ढकलला जातो. हा दाब झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो.

बाष्पोच्छ्वास (Transpiration Pull)

वनस्पती पानांवरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परुपाने पाणी बाहेर टाकतात. पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात त्यांना रक्षक पेशी म्हणतात. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. या क्रियेला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात. पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमीहोते.हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणीपानांपर्यंत आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांनापोहोचवणे यासाठी मदत होते. तर मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.

वनस्पतींमधील अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन

पानांमध्येतयार झालेले अन्न वनस्पतींच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवले जाते. अमिनो आम्ले सोडून जास्तीचे अन्न मूळ, फळे आणि बियांमध्येसाठवले जाते. या क्रियेला पदार्थांचे स्थानांतरण (Translocation) म्हणतात. ही क्रिया रसवाहिन्यांमार्फत वरील तसेच खालील दिशेने केली जाते. पदार्थांचे स्थलांतर ही साधी भौतिक क्रिया नाही, तर तिला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा ATP पासून मिळते.

ज्या वेळी सुक्रोजसारख्या अन्नद्रव्याचे रसवाहिनीमार्फत ATP च्या मदतीने वहन केले जाते त्या वेळी त्या भागातील पाण्याची संहती कमी होते. यामुळे परासरण क्रियेने पाणी पेशीच्या आत शिरते. पेशीतील घटकांमध्येवाढ झाल्यामुळे पेशीच्या भित्तिकेवरील दाब वाढतो. या दाबामुळे अन्नद्रव्य लगतच्या कमी दाबाच्या पेशींमध्येढकलले जाते. ही क्रिया रसवाहिनीस, वनस्पतीच्या गरजेनुसार द्रव्याचे वहन करण्यास मदत करते. फुले येण्याच्या हंगामात मुळांमध्ये किंवा खोडांमध्येसाठवलेली शर्करा कळ्यांचे फुलात रूपांतर करण्यासाठी कळ्यांमध्येपाठवली जाते.

उत्सर्जन (Excretion)

सजीवांमध्येअनेक नको असलेले, घातक पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल, अमोनिआ तयार होतात. हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचवू शकतात किंवा काही वेळा त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. म्हणून हे नको असलेले घातक पदार्थ शरीरातून बाहेरटाकणे आवश्यक असते. यासाठी वेगवेगळ्या सजीवांमध्येवेगवेगळ्या पद्धती असतात.नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. एकपेशीय सजीवांमध्येटाकाऊ पदार्थ पेशींच्या पृष्ठभागापासून थेट बाहेर विसर्जित होतात तर बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते.

वनस्पतींमधील उत्सर्जन (Excretion in Plants)

 वनस्पतींमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते. वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. विसरण क्रियेद्वारे वायुरुप पदार्थ बाहेर टाकले जातात. वनस्पतींमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानातील रिक्तिका, फुले, फळे तसेच खोडावरील सालींत साठवले जातात. काही काळानंतर हे अवयव गळून पडतात. इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपात जीर्ण जलवाहिन्यांत साठवले जातात. वनस्पती मुळांच्यावाटेदेखील आसपासच्या जमिनीत काही टाकाऊ पदार्थ सोडतात.

काही वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्ये कॅल्शिअम ऑक्झलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपात असतात. त्यांना रफाइडस ् असे म्हणतात.

ते सुईच्या आकाराचे असल्यामुळे त्वचेवर टोचतात व खाज सुटते.

वनस्पतींमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहेत. उदा. रबराचा चिक, डिंक, राळ इत्यादी.

मानवामधील उत्सर्जन (Excretion in human beings)

मानवी शरीरात विविध क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रियसंस्था कार्यरत आहेत. जसे अन्नपचनासाठी पचनसंस्था, श्वासोच्छ्वासासाठी श्वसनसंस्था, इत्यादी. आपल्या शरीरात अन्नपचन व त्यातून ऊर्जानिर्मितीचे कार्य पार पडते. त्यावेळी शरीरात विविध टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उत्सर्जन संस्था (Excretory system) कार्यरत असते.

मानवी उत्सर्जन संस्थेत वृक्काची जोडी (Pair of kidneys), मूत्रवाहिनीची जोडी (Pair of Ureters) आणि मूत्राशय (Urinary bladder), मूत्रोत्सर्जक नलिका (Urethra) चा समावेश होतो. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते.

उदराच्या पाठीमागील बाजूस, पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियांच्या आकाराची दोन वृक्के असतात. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात. प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा, पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो त्याला बोमन्स संपुट असे म्हणतात. त्यातील रक्तकेशिकांच्या जाळीला ग्लोमेरुलस असे म्हणतात. यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो. जेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलसमध्येयेते, त्यावेळी ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते व युरीया व तत्सम पदार्थ वेगळे केले जातात.

बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे लहान रेणू छिद्रांतून बाहेर पडू शकतात. बोमन्स संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो. याठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते. उरलेल्या टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होते. हे मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात साठवले जाते. नंतर ते मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते. मूत्राशय स्नायूमय असून त्याच्यावर चेतांचे नियंत्रण असते. त्यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मानवांमध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करतात.

उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे खाली असते. प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे दहा लाख नेफ्रॉन्स असतात. साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लीटर रक्त असते जे वृक्कांमधून रोज 400 वेळा गाळले जाते. वृक्क रोज साधारणपणे 190 लीटर रक्त गाळतात ज्यामधून 1 ते 1.9 लीटर मूत्र तयार होते. उरलेला द्रवपदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो.

रक्त व्याश्लेषण (Dialysis)

दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय होतो व त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. वृक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तातूननायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. या क्रियेला व्याश्लेषण म्हणतात.एका वेळी याउपकरणातून 500 मिली रक्त पाठवले जाते. शुद्धीकरण केलेले रक्त नंतर पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडले जाते.

समन्वय (Co-ordination)

बहुपेशीय सजीवात विविध अवयवसंस्था कार्यरत असतात. या विविध संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरातील विविध उद्दिपने यांच्यामध्ये योग्य समन्वय असेल, तरच तो सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगूशकतो. यावरून आपण असे म्हणूशकतो की विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय. तर विविध क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय.

कोणतीही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्येसुयोग्य समन्वय असणे आवश्यक आहे. समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही घटकांमुळे कोणत्याही टप्प्यांवर गोंधळ निर्माण झाल्यास ती अपेक्षित प्रक्रिया अपूर्ण राहू शकते. प्रत्येक टप्प्यावर यादृच्छिकता (Randomness) असता कामा नये. सजीवात शरीराचे तापमान, जलपातळी, विकर पातळी इत्यादींमुळे व बाह्य पर्यावरणातील उद्दीपनांमुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियांमध्येसुयोग्य समन्वय असणे अत्यावश्यक आहे. इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते; यालाच ‘समस्थिती’ (Homeostasis) असे म्हणतात.

वनस्पतींमधील समन्वय (Co-ordination in Plants)

प्राण्यांमध्येअसलेल्या चेतासंस्था किंवा स्नायूसंस्था यांसारख्या संस्था वनस्पतींमध्येनसतात. तर मग वनस्पती कशाप्रकारे हालचाल दर्शवतात? वनस्पतीमधील हालचाल प्रामुख्याने उद्दीपनाला दिलेल्या प्रतिसादाच्या स्वरूपात असते.

बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजे अनुवर्तन (Tropism) किंवा ‘अनुवर्ती हालचाल’ (Tropic movement) होय.

कोणत्याही वनस्पतीची प्ररोह संस्था (Shoot System) प्रकाश उद्दिपनास प्रतिसाद देते. म्हणजेच प्रकाश स्त्रोताच्या दिशेने तिची वाढ होते. वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस ‘प्रकाशानुवर्ती हालचाल’ (Phototropic movement) असे म्हणतात.

वनस्पतींची मूळ संस्था (Root System) गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दिपनांना प्रतिसाद देते. या प्रतिसादांना अनुक्रमे गुरुत्वानुवर्ती हालचाल (Gravitropic Movement) व जलानुवर्ती हालचाल (Hydrotropic movement) असे म्हणतात.

विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन-अनुवर्तन (Chemotropism)असे म्हणतात.उदा. बिजांडाच्या दिशेने होणारीपरागनलिकेची वाढ. वरील सर्व प्रकारच्या हालचाली या वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत म्हणून या हालचालींना वनस्पतींमधील वृद्धी संलग्न हालचाली असे म्हणतात.

बारकाईने पाहिले असता लाजाळूसारख्या वनस्पतीलाज्या ठिकाणीस्पर्श होतोत्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही हालचाल होते. यावरून आपण असे अनुमान काढूशकतो की स्पर्श झाला आहे ही माहिती वनस्पतीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित झाली असलीपाहिजे.ही माहितीएका ठिकाणाहूनदुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वनस्पती विद्युत-रासायनिक आदेशांचा उपयोग करतात. वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करून आपला आकार बदलतात व वनस्पतीची हालचाल घडवून आणतात.

वनस्पतींतील काही विशिष्ट हालचालींचे पर्यवसन त्यांच्या वाढीत होत नाही. अशा हालचालींना वृद्धी- असंलग्न हालचाल असे म्हणतात. भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसादम्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात.

मानवातील समन्वय (Co-ordination in human being)

मानवी शरीरात एकाच वेळी विविध क्रिया घडून येत असतात. त्या क्रियांचे उत्तम प्रकारे व परिणामकारकरित्या समन्वयन व नियंत्रण करणे जरुरीचे असते. ते दोन यंत्रणाद्वारे केले जाते.

अ. चेतानियंत्रण (Nervous Control): पर्यावरणातील बदलांना प्रतिसाददेण्याची क्षमता मानवामध्येचेतानियंत्रणाद्वारे प्राप्त होते. पर्यावरणातील बदलांच्या अनुषंगाने मानवी शरीरात आवेग निर्माण होतात. पेशींमध्ये या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य चेतानियंत्रणाद्वारे केले जाते. आवेगांना प्रतिसाद देण्याचे कार्य हे सजीवांच्या शरीर रचनेतील क्लिष्टतेवर अवलंबून असते. अमीबासारख्या एकपेशीय प्राण्यांमध्येअशा प्रकारचे आवेग व प्रतिसाद निर्माण करणारी चेतासंस्था नसते. परंतुमानवासारख्या बहुपेशीय प्राण्यांमध्येआवेगांना प्रतिसाद देण्यासाठी चेतासंस्थेसारखी यंत्रणा कार्यरत असते. हे नियंत्रण शरीरातील विशेष प्रकारच्या पेशींद्वारे केले जाते. या पेशींनाच आपण चेतापेशी असे म्हणतो.

चेतापेशी (Neuron): शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी (Neurons) असे म्हणतात. चेतापेशी या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत. मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या चेतापेशींची लांबी काही मीटरपर्यंत भरते. चेतापेशींमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते. चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध (Neuroglia) असे म्हणतात. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या साहाय्याने चेता (Nerves) बनतात.

आपल्या पर्यावरणातील सर्व माहिती चेतापेशीतील वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकांद्वारे ग्रहण केली जाते. तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात. त्यांचे वहन वृक्षिके(Dendrite) कडून पेशीकायेकडे (Cell body);पेशीकायेकडूनअक्षतंतू (Axon)कडे वअक्षतंतूकडून त्याच्या टोकाकडे होते. हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित केले जातात. यासाठी पहिल्या अक्षतंतूच्या शेवटच्या टोकाशी पोहोचलेला विद्युत आवेग चेतापेशीला काही रसायने स्रवण्यास उद्युक्त करतो. ही रसायने दोन चेतापेशींदरम्यानअसलेल्या अतिसूक्ष्म पोकळीतूनम्हणजेच संपर्कस्थानातून (Synapse) जातात व तसाच आवेग पुढील चेतापेशीच्या वृक्षिकेमध्ये निर्माण करतात. अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि हे आवेग चेतापेशींकडून अंतिमत: स्नायूपेशी किंवा ग्रंथीकडे पोहोचवले जातात.

जेव्हा एखादी कृती किंवा हालचाल घडवून आणायची असते, तेव्हा सर्वांत शेवटचे कार्यहे स्नायू ऊतींचे असते. कोणतेही कार्यहोण्यासाठी स्नायू पेशींची हालचाल होणे आवश्यक असते. जेव्हा पेशी आखूड होण्यासाठी आपला आकार बदलतात, तेव्हा पेशींच्या पातळीवर हालचाल घडून येते. स्नायू पेशींमध्ये असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे आकार बदलण्याची क्षमता प्राप्त होते. तसेच याच प्रथिनांमुळे चेतांच्या विद्युत आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता पेशीत निर्माण होते.

यावरुन आपण असे म्हणू शकतो की विद्युत आवेगाच्या स्वरूपातील माहितीचे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करण्याची क्षमता असलेल्या चेतांच्या सुसंघटित जाळ्याने चेतासंस्था बनलेली असते.

चेतापेशींचे प्रकार (Types of Nerve cells/Neurons )

चेतापेशींच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत करतात.

  1. संवेदी चेतापेशी (Sensory Neurons) : संवेदी चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात.
  2. प्रेरक चेतापेशी (Motor Neurons) : प्रेरक चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथींसारख्या प्रेरक अवयवांकडे करतात.
  3. सहयोगी चेतापेशी (Association Neurons) : सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे संकलनात्मक कार्य करीत असतात.

मानवी चेतासंस्था (The Human Nervous System)

 मानवी चेतासंस्था पुढील तीन भागात विभागली आहे.

  1. मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System )
  2. परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System )
  3. स्वायत्त चेतासंस्था (Autonomic Nervous System)

मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System or CNS)

मेंदूची रचना अतिशय नाजूक परंतु अत्यंत विकसित अशी आहे.

मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच कर्परेमध्ये तो संरक्षित असतो. मेरुरज्जूला (Spinal cord) कशेरूस्तंभाचे / पाठीच्या कण्याचे (Vertebral column) संरक्षण मिळते. नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थी (हाडे) यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे (Meninges) असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलये (Ventricles) तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल (Central canal) म्हणतात. मस्तिष्क निलये, मध्यनाल व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांमध्ये प्रमस्तिष्क-मेरुद्रव (Cerebro-Spinal fluid) असतो. हा द्रव मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषकद्रव्ये पुरवतो तसेच आघातांपासून तिचे संरक्षणही करतो.  मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जूयांनी बनलेली असते.

प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून तो सुमारे 100 अब्ज चेतापेशींचा बनलेला असतो.

आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. याव्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते.

प्रमस्तिष्क (Cerebrum)

हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो. हे गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग(Nerve track) यांनी एकमेकांना जोडलेले असतात. मेंदूचा एवढा भाग प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो म्हणूनच याला मोठा मेंदू असेही संबोधतात. प्रमस्तिष्काचा बाहेरील पृष्ठभाग हा अनियमित वळ्या व खाचा यांनी बनलेला असतो. त्यांना संवलन असे म्हणतात. यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते व चेतापेशींसाठी भरपूर जागा मिळते.

अनुमस्तिष्क (Cerebellum)

हा मेंदूचा छोटा भाग असून, कर्परगुहेच्या (कवटीच्या) मागील बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो. याचा पृष्ठभाग वळ्यांऐवजी उंचवटे व खळगे या स्वरूपांत असतो.

मस्तिष्कपुच्छ (Medulla- oblongata)

हा मेंदूचा सर्वात शेवटचा किंवा पुच्छबाजूचा भाग असून याच्या वरील बाजूस दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या संरचना असतात. त्यांना पिरॅमिड म्हणतात. याच्या पश्चभागाचे पुढे मेरुरज्जूत रुपंातर होते.

मेरुरज्जू (Spinal Cord)

हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरुस्तंभामध्ये स्थिर असतो. तो काहीसा जाडसर असून तो पुढे निमुळता होत जातो. त्याच्या शेवटी तंतूमय धाग्यासारखा भाग असतो. त्याला अंत्यतंतू(Filum terminale) असे म्हणतात.

परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System)

परिघीय चेतासंस्थेमध्येमध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागांशी जोडतात. यातील चेता दोन प्रकारच्या असतात.

अ. कर्परचेता (Cranial Nerves) मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता म्हणतात. शिर , छाती व पोटातील विविध भागांशी या संलग्नित असतात. कर्पर चेतांच्या 12 जोड्या असतात.

ब. मेरुचेता (Spinal Nerves) मेरुरज्जूपासून निघणाऱ्या चेतांना मेरुचेता असे म्हणतात. याहात-पाय, त्वचा तसेच शरीराच्या इतर भागांशी संलग्नित असतात. मेरुचेतांच्या 31 जोड्या असतात.

3. स्वायत्त चेतासंस्था (Autonomic Nervous System)

हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवांतील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. याचे नियंत्रण आपल्या इच्छेवर असत नाही.

प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action)

 पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. आपण काही घटनांना काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय योग्यप्रकारे राखला जातो .

आ. रासायनिक नियंत्रण (Chemical Control)

आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थांमार्फतदेखील समन्वयन व नियंत्रण केले जाते. अंत:स्रावी ग्रंथींतून संप्रेरके स्रवतात. या ग्रंथींना वाहिनीविरहित ग्रंथी असेही म्हटले जाते. या ग्रंथींकडे त्याचा स्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरके तयार होताच ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात. या अंतस्रावी ग्रंथी (Endocrine glands) शरीरामध्ये जरी ठरावीक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्वभागात पोहोचतात.

अंतस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्यया दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात. या दोन संस्थांतील लक्षणीय फरक म्हणजे, चेता आवेग हे जलद परंतु अल्पावधीसाठीच असतात, तर संप्रेरकांची क्रिया मात्र खूप धिम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाल टिकणारी असते.

गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकांचे स्रवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ याचे नियमन केले जाते. उदा. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडातील पेशींना त्याची जाणीव होते व या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्सुलीनची निर्मिती करतात.