16. नैसर्गिक साधनसंपत्ती

िसर्गातून आपल्याला अनेक पदार्थ मिळतात. त्यांतून आपल्या वेगवेगळ्या दैनंदिन गरजा भागतात. पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी हे सर्व म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्तीच आहे.

भूकवचातील साधनसंपत्ती (Natural resources in earth crust)

पृथ्वीच्या शिलावरणाचा भाग जमीन व त्याखालील कठीण कवच यांनी बनलेला आहे. शिलावरण हे एकजिनसी नसून अनेक प्रकारच्या खडकांचे बनलेले आहे. भूकवचातील साधनसंपत्तीमध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये, इत्यादींचा समावेश होतो.

खनिजे आणि धातुके (Minerals and Ores)

नैसर्गिक साधनसंपदेत खनिज संपदेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिजे तयार झालेली असतात. पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात. खाणकामाद्वारे ही खनिजे मानवास उपलब्ध होतात. निसर्गात थोडेच धातू मुक्त स्थितीत आढळतात. उदा., सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ. बहुतेक सर्व धातू संयुगांच्या स्वरूपात आढळतात. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातुक म्हणतात. धातुकांपासून धातू किफायतशीररीत्या मिळवता येतात. विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार (लांबी), फटी, छटा यांवरून खनिजांचे गुणधर्म स्पष्ट होतात.

काही प्रमुख खनिजे व धातुके

  1. लोहखनिज ः अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास लोहखनिज म्हणतात. टाचणीपासून ते अवजड उद्योगधंद्यांपर्यंत विविध साहित्यनिर्मितीमध्ये लोखंड वापरले जाते. उदाहरणार्थ, शेतीची अवजारे, रेल्वे रूळ इत्यादी. मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट, सिडेराईट ही चार प्रमुख लोहखनिजे आहेत.
  2. मँगनीज ः मँगनीजची खनिजे कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साइड या स्वरूपात आढळतात. मँगनीजच्या संयुगाचा वापर औषधे तयार करण्यासाठी तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो. विद्युत उपकरणांमध्येही मँगनीज वापरले जाते.
  3. बॉक्साईट ः बॉक्साईट हे ॲल्युमिनिअमचे प्रमुख धातुक आहे. यामध्ये ॲल्युमिनिअमचे प्रमाण 55% असते. बॉक्साईट हे प्रामुख्याने ॲल्युमिनिअम ऑक्साइडपासून बनलेले असते. ॲल्युमिनिअम हा उत्तम वीजवाहक व उष्णतावाहक अाहे. त्याची घनता कमी आहे, त्यामुळे विमाने, वाहतुकीची साधने, विद्युत तारा यांमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
  4. तांबे ः तांबे हे लोह व इतर खनिजांच्या सान्निध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. तांबे हे शीघ्र विद्युतवाहक अाहे, त्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी व मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा वापर केला जातो.
  5. अभ्रक ः अभ्रक हे विद्युतरोधक असून त्याच्या थरांच्या जाडीवर त्याची किंमत ठरते. औषधे, रंग, विद्युतयंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर करण्यात येतो.

इंधन (Fuel)

दैनंदिन वापरामध्ये ऊर्जानिर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना इंधने असे म्हणतात. ही इंधने स्थायू, द्रव, वायू या अवस्थांमध्ये आढळून येतात.

दगडी कोळसा (Coal)

लाखो वर्षांपूर्वी नैसर्गिक घडामोडींमुळे जंगले जमिनीत गाडली गेली. त्यांच्यावर मातीचे थर जमा होत गेले. वरून प्रचंड दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम होऊन गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर हळूहळू इंधनात झाले. त्या वनस्पतींच्या अवशेषांपासून दगडी कोळसा तयार झाला, त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन (Fossil Fuel) म्हणतात.

दगडी कोळसा हा खाणींमध्ये सापडतो. पीट, लिग्नाइट (ब्राउन कोल), बिट्युमिनस कोल, अँथ्रासाइट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. अँथ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा आहे.

दगडी कोळसा हा एक प्रकारे कार्बनचा साठा असून त्यापासून औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी तो जाळला जातो. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामध्ये दगडी कोळसा इंधन म्हणून वापरतात. तसेच त्याचा उपयोग बॉयलर्स व रेल्वे इंजिने चालवण्यासाठीही केला जातो. दगडी कोळशाचा उपयोग स्वयंपाकासाठी आणि विटा भाजण्यासाठी वीटभट्ट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. औद्योगिक विकासात दगडी कोळसा या ऊर्जासाधनाचे महत्त्वाचे योगदान आहे. दगडी कोळशापासून प्रोड्यूसर गॅस व वॉटर गॅस ह्या वायुरूप इंधनांची निर्मिती केली जाते.

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इंधनांची मागणी वाढली आहे. मात्र जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. वाढीव मागणीची पूर्तता करणे अवघड होत चालले आहे, ते संपण्याची भीती म्हणजे ऊर्जा संकट होय. खनिज तेल, दगडी कोळसा या जीवाश्म इंधनांचे मर्यादित साठे व वाढती मागणी म्हणून पर्यायी इंधने वापरात येऊ लागली आहेत. हायड्रोजन, जैव इंधने, मिथेनॉल किंवा वुड अल्कोहोल, इथेनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी इंधने आहेत.

वनसंपत्ती (Forest resources)

वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेल्या सर्वसाधारण विस्तृत प्रदेशास जंगल म्हणतात. विविध वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल होय. जगाच्या एकूण भूभागांपैकी सुमारे 30% भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. जंगलांची विशिष्ट अशी संरक्षक व उत्पादक कार्ये आहेत.

सागरसंपत्ती (Ocean resources)

पृथ्वीवर जमिनीपेक्षाही अधिक भाग सागराने व्यापला आहे. हे आपण अभ्यासले आहे. महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. भरती-अोहोटीच्या लाटा आणि समुद्रप्रवाहांचा उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी केला जात आहे. याविषयी आपण मागील इयत्तेत भूगोल विषयातही माहिती घेतली आहे.सागरजलात, सागरतळावर व सागरतळाखाली विविध नैसर्गिक संपत्तींचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला ‘सागरसंपत्ती’ असे म्हणतात.

सागरी खनिज व जैविक संपत्ती (Mineral and Bio-resources of ocean)

महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमिअम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मँगनीज, गंधक, युरेनिअम इत्यादींचे साठे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती मिळतात. खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षासुद्धा अधिक असते. सागरतळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो.