अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवानेअवलंबिलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. दोन भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय घडून येणारे हेप्रजनन असल्यामुळेनवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. या प्रजननात केवळ एका जनकापासूननवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा तर वेगाने होणारेप्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे.
अ. एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction in unicellular organisms)
1. द्विविभाजन (Binary fission)
आदिकेंद्रकी सजीव (जीवाणू), आदिजीव (अमिबा, पॅरामेशियम, युग्लीना, इत्यादी), दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरीतलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागांत विभाजन होऊन दोन न वजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री (mitosis) किंवा असूत्री (amitosis) पद्धतीने होते.
वेगवेगळ्या आदिजीवांमध्येविभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो; म्हणून याला ‘साधे द्विविभाजन’ म्हणतात. पॅरामेशियम ‘आडवे द्विविभाजन’ या पद्धतीने तर युग्लीना ‘उभे द्विविभाजन’ या पद्धतीने विभाजित होतो.
सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हा अवलंबले जाते.
2. बहुविभाजन (Multiple fission)
अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात.
ज्या वेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्या वेळी अमिबा छद्मपाद तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण, संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला ‘पुटी’ (Cyst) म्हणतात.
पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे-छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुटीमध्येच राहतात.अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात.
3. कलिकायन (Budding)
तुम्हांला किण्व-पेशी मुकुलायन/कलिकायन करताना दिसतील म्हणजेच अनेक किण्व-पेशींना एक-एक छोटी कलिका दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीनेअलैंगिक प्रजनन होते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीनेप्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनानेदोन नवजात केंद्रकेतयार करते. या पेशीला जनक-पेशी म्हणतात. या जनक-पेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. दोन नवजात केन्द्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक-पेशीपासून वेगळी होतेआणि स्वतंत्र नवजात किण्व-पेशी म्हणून वाढूलागते.
आ. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction in multicellular organisms)
1. खंडीभवन (Fragmentation)
हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांत आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचेअनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीवम्हणून जीवन जगूलागतो. जसेकी, शैवाल स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारेप्रजनन होते.
स्पायऱोगायराला ज्या वेळी मुबलक पाणी आणि पोषकद्रव्ये उपलब्ध असतात त्या वेळी त्याच्या तंतूंची वेगानेवाढ होऊन तेतंतू छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो. सायकॉनच्या शरीराचेजर अपघाताने छोटे-छोटेतुकडेझालेतर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो.
2. पुनर्जनन (Regeneration)
तुम्हांला माहिती असेल की धोक्याच्या वेळीपाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतरानेतोडून टाकलेला शेपटीचा भाग पुनर्जनीत केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे. परंतु प्लानेरियासारखेकाही प्राणी विशिष्ट
परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार होतात. यालाच पुनर्जनन म्हणतात.
3. मुकुलायन (Budding)
पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर, पचन-गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर-स्तर व पचन-गुहेशी संलग्न असतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्या वेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याइतपत होते त्या वेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो.
4. शाकीय प्रजनन (Vegetative propagation)
वनस्पतींमध्येमूळ, खोड, पान, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेया डोळ्यांच्या (मुकुल) किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते.ऊस, गवत यांसारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते.
5. बीजाणू निर्मिती (Spore formation)
म्युकरसारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणूधानी असतात. बीजाणूधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर, उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते.
अलैंगिक प्रजनन (Asexual reproduction)
लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. त्या दोन जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक होत. लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया दिसून येतात.
1. युग्मक निर्मिती – या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते त्यामुळे या जनक पेशी या एकगुणी (haploid) असतात.
2. फलन (Fertilization) – या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी (Diploid) युग्मनजाची (Zygote) निर्मिती होते. याला फलन (fertilization) म्हणतात. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो.
या प्रजननामध्ये नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. नर जनकाचे पुंयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जिवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्मांबाबत जनकांशी साम्य दाखवतो तर काही गुणधर्म जनकांपेक्षा वेगळे असतात. जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकविण्यास मदत करते, त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वत:स वाचवू शकतात.
अ. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in plants)
वनस्पतींमध्येफूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण चार मंडले असतात- निदलपुंज (Calyx), दलपुंज (Corolla), पुमंग (Androecium) आणि जायांग (Gynoecium). यांपैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून यांना ‘आवश्यक मंडले’ (Essential Whorls) म्हणतात तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना ‘अतिरिक्त मंडले’ (Accessary Whorls) म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना ‘निदल’ म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना ‘पाकळ्या’ म्हणतात आणि त्या विविधरंगी असतात.
पुमंग हे पुल्लिंगी (Male) दल आहे. त्याच्या घटक दलांना पुंकेसर (Stamen) म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी (Female) दल आहे. त्याच्या घटक दलांना स्त्रीकेसर (Carpel) म्हणतात.
जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला ‘उभयलिंगी’ (Bisexual) म्हणतात. उदा. जास्वंदी. जर फुलामध्ये वरील दोहोंपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला ‘एकलिंगी’ फूल म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर ‘नर फूल’ आणि फक्त जायांग असेल तर ‘मादी फूल’. उदा. पपई.
बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला ‘पुष्पवृंत’ (Pedicel) म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात तर देठच नसणाऱ्या फुलांना ‘स्थानबद्ध’ (Sessile) फुले म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक वृंत (Filament) असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश (Anther) असतो.
परागकोशामध्ये चार कप्पे असतात त्यांना कोष्ठक (Locules) म्हणतात. या कोष्ठकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेशराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षीवृंत (Style) निघते. कुक्षीवृंताच्या टोकाशी एक कुक्षी (Stigma) असते.
अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे (Ovules) असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोष (Embryo-sac) तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी /अर्धसूत्री (Haploid) अंडपेशी (Egg cell) आणि दोन एकगुणी ध्रुवीय केंद्रके (Polar Nuclei) असतात. परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागण / परागीभवन (Pollination) म्हणतात. परागण अजैविक घटक (वारा, पाणी) किंवा जैविक घटक (कीटक, पक्षी आणि इतर प्राणी, पक्षी) यांच्या मदतीने होते.
परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात. म्हणजेच त्यांत दोन पुंयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका दोन पुंयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोषात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुंयुग्मक भ्रूणकोषामध्ये सोडले जातात. त्यांतील एक पुंयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज (Zygote) तयार होतो. यालाच फलन (Fertilization) म्हणतात. दुसरे पुंयुग्मक दोन ध्रुवीय केंद्राकांशी संयोग पावून भ्रूणपोष (Endosperm) तयार होतो. या प्रक्रियेत दोन पुंयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन (Double Fertilization) म्हणतात.
फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ फुटून बीज जमिनीवरती पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण म्हणतात.
आ. मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being)
अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये आपण पाहिले की पुरुषांमध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रांमुळेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरांमध्येविशिष्ट अवयव असलेल्या प्रजननसंस्था तयार होतात. पुरुषांमध्ये Y गुणसूत्र वेगळे असते तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्येही असते. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते तर X स्त्रीत्वासाठी. मग पुरुषांमध्ये X गुणसूत्र कशासाठी असते? आता आपण मानवी प्रजनन संस्था कशी असते व तिचे कार्य कसे चालते याचा अभ्यास करूयात.
मानवी पुरुष प्रजनन संस्था (Male reproductive system)
मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण (Testes), विविध वाहिन्या/नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते. वृषण उदर पोकळीच्या बाहेर वृषणकोषामध्ये (Scrotum) असते. वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. त्यांमध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी (Germinal epithelium) अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी (Sperm) तयार करतात. तयार झालेल्या शुक्रपेशी विविध नलिकांद्वारे पुढे पाठवल्या जातात. त्या नलिकांचा क्रम वृषणजालिका (Rete testis), अपवाहिनी (Vas efferens), अधिवृषण (Epididymis), शुक्रवाहिनी (Vas deferens), स्खलन वाहिनी (Ejaculatory duct), मूत्र-जनन वाहिनी (Urinogenital duct) असा आहे. शुक्रपेशी जशा जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तसतसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास पात्र बनतात.
शुक्राशयाचा (Seminal vesicle) स्राव स्खलन ग्रंथीमध्येस्रवला जातो तर पुःरस्थ ग्रंथी (Prostate gland) आणि काऊपर्स ग्रंथी (Cowper’s gland) त्यांचा स्राव मूत्र जनन वाहिनीमध्ये स्रवतात. हे सर्वस्त्राव आणि शुक्राणू मिळून ‘रेत’ (Semen/वीर्य) तयार होते. हे रेत शिश्नाद्वारे (Penis) बाहेर सोडले जाते. मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्येमूत्र जनन वाहिनी, पु:रस्थ ग्रंथी, वृषण कोष व शि
श्न वगळता उर्वरीत सर्व अवयवांची एक –एक जोडी असते.
मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female reproductive system)
स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात. त्यांमध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त बथलीन्स ग्रंथीची एक जोडी असते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळी-पाळीने एका एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासरखा असतो. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात.
युग्मक निर्मिती (Gamete formation)
शुक्रपेशी (शुक्राणू) आणि अंडपेशी ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात. स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्याच्या अंडाशयात 2–4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात, तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत (साधारणतः वय वर्षे 45) दरमहा एका अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. स्त्री-प्रजनन संस्थेचे कार्य वयपरत्वेथांबण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. साधारणतः 45–50 वर्षांदरम्यान स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांचे स्त्रवणे विस्कळीत होते/थांबते. यामुळे रजोनिवृत्ती येते.
फलन (Fertilization)
शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेस फलन म्हणतात. मानवामध्येफलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते. समागमावेळी स्त्रीच्या योनीमार्गामध्ये रेत स्खलित केले जाते. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनी मार्ग – गर्भाशय – अंडनलिका असा प्रवास करतात व त्यांतील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते.
यौवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत (साधारणतः 10 –17 व्या वर्षापासून 45 –50 व्या वर्षापर्यंत) दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत 2– 4 दशलक्ष अंडपेशींपैकी साधारणतः फक्त 400 च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशी ऱ्हास पावतात.
विकास व जन्म (Development and Birth)
अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो. यादरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ/विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्नपुरवठा करण्यासाठी ‘अपरा’ (Placenta) नावाचा अवयव तयार होतो. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते.
आर्तवचक्र / ऋतुचक्र (Menstrual cycle)
यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसांच्या कालावधीनेपुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र/ऋतुचक्र म्हणतात. आर्तवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून चार संप्रेरकांद्वारेतिचे नियंत्रण होते. पुटीका ग्रंथी संप्रेरक (Follicle Stimulating Hormone), ल्युटीनायझींग संप्रेरक (पितपिंडकारी संप्रेरक / Luteinizing Hormone), इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही ती चार संप्रेरके होत. पुटीका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळेअंडाशयात असलेल्या असंख्य पुटीकांपैकी एका पुटीकेसह त्यातील अंडपेशीचा (डिंबपेशीचा /Oocyte) विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ (पहिल्या ऋतुचक्रावेळी) किंवा पुनर्निमिती (नंतरच्या सर्व ऋतुचक्रांवेळी) होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची (Follicle) पूर्ण वाढ होते. पितपिंडकारी संप्रेरकाच्या (Luteinizing hormone) प्रभावामुळेपूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन (Ovulation) म्हणतात. अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते. हे पितपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होतेव असेअंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते.
अंडपेशीचेफलन 24 तासात जर झालेनाही तर पितपिंड अकार्यक्षम होऊन त्याचेरूपांतर श्वेतपिंडात (Corpus albicans) होते. यामुळेइस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणेपूर्णपणे थांबते. या संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊनत्या अंतःस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्गाद्वारे बाहेर टाकलेजाते. या बरोबरच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारणतः पाच दिवस सुरु राहतो. यालाच ऋतुस्राव / मासिक पाळी असेसंबोधतात. या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशीचेफलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचेरोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत राहते.
भ्रूणाचेरोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4-5 दिवसांचा रजःस्रावाच्या कालावधी मध्ये स्त्रीला वेदना होत असतात. तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानेअशक्तपणा जाणवतो. या काळामध्ये स्त्रीला संसर्गाचीही शक्यता असते. या सर्वकारणांमुळेया दिवसांमध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच विश्रांतीची गरज असते.
प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान (Reproduction and advanced technology)
अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळेअपत्ये होत नाहीत. स्त्रियांबाबत मासिक पाळीतीलअनियमितता,अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशातअसणारेअडथळे, गर्भाशयाच्या रोपणक्षमतेतीलअडथळेइत्यादी कारणांमुळेअपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणेअभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशींतील विविध व्यंग इत्यादी कारणेअपत्यप्राप्तीत बाधा आणतात. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळेआता या अडचणींवर मात करता येऊ शकते. IVF, भाडोत्री मातृत्व (Surrogacy), वीर्य पेढी इत्यादी तंत्रांच्या साहाय्यानेआता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते.
काचनलिकेतील फलन (IVF -In Vitro Fertilization )
या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये दोन युग्मकांचेफलन घडवून आणलेजातेआणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचेअल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेलेअडथळेइत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हेतंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते.
भाडोत्री मातृत्व (Surrogacy)
काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. त्यामुळेअशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व (Surrogacy) या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घेता येते. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीचेकाचनलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणलेजाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. अशा परिस्थितीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण-रोपण केलेजातेत्या स्त्रीला भाडोत्री माता (Surrogate Mother) म्हणतात.
फलन वीर्यपेढी (Sperm Bank / Semen Bank)
अनेक दाम्पत्यांतील पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीत वर नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतात. अशा दाम्पत्यांबाबतीत अपत्यप्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढेआली आहे. रक्तपेढीसारखीच ही संकल्पना आहे. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यांनंतर त्यांनी स्खलित केलेलं वीर्य साठवून ठेवलेजाते.
गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दांपत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्रानेफलित केली जातेआणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचेसंबधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केलेजाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचेनाव गुप्त ठेवलेजाते.
जुळे (Twins)
गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्ये जन्मास येतात. अशा अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळी अपत्ये होतात. जुळ्या अपत्यांचेमुख्य दोन प्रकार आहेत- एकयुग्मजी जुळेआणि द्वियुग्मजी जुळे. एकयुग्मजी जुळी अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये (युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत) त्यातील पेशी अचानक दोन गटांमध्ये विभागल्या जातात.
हेभ्रूणपेशींचेदोन्ही गटदोन वेगळे-वेगळेभ्रूण म्हणून वाढूलागतात आणि पूर्ण वाढ होऊनएकयुग्मजी जुळेजन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. त्यामुळे ही अपत्ये दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग समानच असते, म्हणजेच दोन्ही मुली असतील किंवा मुलेअसतील.
एकयुग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसांनंतर झाली तर सायामिज जुळे(Siamese / Conjoined twins) जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. अशी जुळी अपत्ये शरीराच्या काही भागांत एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यांमध्ये काही अवयव सामायिक असतात.
अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी दोन अंडपेशी बाहेर पडतात आणि दोन वेगवेगळ्या शुक्राणुंद्वारेत्या फलित होऊन दोन युग्मनज (Zygotes) तयार होतात. या दोन्ही युग्मजांपासून दोन भ्रूण तयार होऊन दोन्हींचेगर्भाशयात रोपण होतेआणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळी अपत्ये जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असूशकतात.
लैंगिक आरोग्य (Reproductive health)
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या आणि इतर कारणांमुळेआपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनेकाम करत आहेत. त्यामुळेत्यांना दिवसभर घराबाहेर रहावेलागते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो. त्यामुळेगुप्तागांची वेळोवेळी स्वच्छता राखणेआवश्यक असतेअन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवूशकतात. त्या टाळण्यासाठी गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणेअत्यंत आवश्यक आहे.
लैंगिक आजारांमध्ये सायफिलीस आणि गोनोऱ्हीया हे दोन आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे दोन्ही आजार जीवाणूंमुळे होतात. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे, इत्यादी लक्षणे सायफिलीस या आजारामध्ये आढळून येतात. गोनोऱ्हीया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनीमार्गातून पू स्त्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.