5. अन्नपदार्थांची सुरक्षा

कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहेत. पण हे अन्नघटक ज्या पदार्थांतून मिळतात जसे- गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादी खराब किंवा किडलेले असतील तर काय होईल?

अन्नबिघाड (Food Spoilage)

अन्नबिघाडास कारणीभूत घटक

 काही वेळा फळे-फळांच्या साली काळपट पडतात. काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घाणेरडा वास येतो. हे पदार्थ खाण्यास अयोग्य असतात. काही वेळा निसर्गतः मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात उदाहरणार्थ, जास्त शिजवणे, ओलसर जागी ठेवणे, अयोग्य साठवणूक यांमुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना ते खराब होतात. याविषयीची अधिक उदाहरणे तुम्हांला देता येतील का?

सुट्टीच्या दिवशी बाहेर गेल्यावर आपण आपल्या परिवारासोबत/ मित्रमैत्रिणींसोबत पाणीपुरी, वडापाव, पिझ्झा, बर्गर, शेवपुरी, पावभाजी असे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आवडीने खातो, पण हे पदार्थ कोठे बनवले जातात? कोणत्या ठिकाणी विक्रीस ठेवलेले असतात? आपणांस हे पदार्थ देणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ होते का? यासाठी कोणते पाणी वापरले होते? या सर्वांचा आपण विचार करतो का? या सर्व बाबींची तुमच्या विज्ञान शिक्षकांसोबत चर्चा करा.

फळांचा रंग काळपट होणे, चव बदलणे, मांसाला आंबट वास येणे, शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारचे बदल अन्नपदार्थांत घडतात. हे सर्व बदल अंतःस्थ घटकांमुळेच होतात. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोचते. जसे, अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात. काही अन्नपदार्थ, उदा., दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्न बिघडते.

अन्ननासाडी (Food Wastage)

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे. असे जरी असले तरी आजही आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय झोपी जातात. त्यांना एकवेळचे जेवणही मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जाते ते टाळणे आपले प्रथम कर्तव्य आहे.

संख्यात्मक अन्ननासाडी (Quantitative wastage of food) ः चुकीच्या पद्धतीने शेती करणे. उदाहरणार्थ, मुठीने पेरणे, अव्यवस्थित मळणी करणे, अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर करणे तसेच पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने सुद्धा अन्न वाया जाते. यांमुळे संख्यात्मकरीत्या अन्ननासाडी होते कारण वाया गेलेले अन्न इतरांना देता आले असते.

गुणात्मक अन्ननासाडी (Qualitative wastage of food) ः अन्नरक्षण करताना अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, तसेच द्राक्षे, आंबे यांची अयाेग्य हाताळणी इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात.

अन्नसाठवण व सुरक्षा (Food storage and preservation)

अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे. अशा अन्नपदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या पद्धतींची माहिती आपण मागील इयत्तेत घेतली आहे. या विविध पद्धतींमुळे अन्नपदार्थांत होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि ते खराब होत नाहीत.

अन्नरक्षण व परिरक्षण

अन्नरक्षण ः वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यांपासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्नरक्षण होय.

अन्नपरिरक्षण ः अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो. या पद्धतीला अन्नपरिरक्षण असे म्हणतात.

भेसळयुक्त अन्नामुळे लहान-मोठे, गरीब[1]श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. अन्नातील वेगवेगळ्या भेसळींचे वेगवेगळे परिणाम असतात. काही भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो.