9. आपत्ती व्यवस्थापन

भूकंप (Earthquake)

 भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास ‘भूकंप’ म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे-पुढे किंवा वर[1]खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा/हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वांत जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त असते. पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे भूकंप होतो. National Earthquakes information centre च्या निरीक्षणानुसार अापल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400-14,000 भूकंप होतात. (संदर्भ ः www.iris. edu.) या वरून लक्षात येते, की पृथ्वी सतत कमी- अधिक प्रमाणात कंप पावत असते.

भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ अथवा ‘सेस्मोमीटर’ असे नाव आहे. तसेच भूकंपाची ‘तीव्रता’ मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. भूकंपाच्या परिणामांचे वर्णन दिले आहे. या तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा.

 

भूकंपात घ्यायची दक्षता ः

 भूकंपाच्यावेळी तुम्ही घरामध्ये असाल, तर

भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता सैरावैरा न पळता, आहे त्याच जागी शांत उभे राहावे. जमिनीवर बसा, टेबल, पलंग कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल, तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा.

चालत्या वाहनात असाल, किंवा घराबाहेर असाल, तर

सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनाच्या आत थांबा, बाहेर येण्याचे टाळा. इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका.

भूकंपाच्या वेळी हे करू नका.

 1. बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नका. जिना वापरा.
 2. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करा.
 3. भूकंपानंतर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागू शकते. हे टाळण्यासाठी घरातील मेन स्वीच दक्षतापूर्वक बंद करा. अशा प्रसंगी मेणबत्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करू नका. बॅटरी / टॉर्चचा वापर करा.

भूकंपरोधक इमारती ः जमिनीची ठराविक मर्यादेपर्यत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात. इमारतींच्या बांधकामांसाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवलेले आहेत. आय एस. 456 प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी ‘आय एस 1893 (भूकंपरोधक आरेखनांच्या संरचनांचे मानदंड) आणि आय एस 13920 (भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचनाचा ताणीय विस्तार) वापरले जातात. भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी लेसर रेंजिग, व्हेरी लाँग, बेसलाईन, गायगर कौंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यांसारखी आधुनिक साधने वापरली जातात.

आग (Fire)

आगीचे प्रकार (Types of Fire)

 1. ‘अ’ वर्गीय आग (घनरूपपदार्थ) ः सर्वसाधारण ज्‍वालाग्राही घनपदार्थांपासूनची आग (जसे, लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्‍यादी.) थंडावा निर्माण करून विझवली जाते.
 2. ‘ब’ वर्गीय आग (द्रवरूप पदार्थ) ः ज्‍वालाग्राही द्रव पदार्थापासून लागलेली आग उदा. पेट्रोल, तेल, वार्निश, द्रावके, स्‍वयंपाकाचे तेल, रंग इत्‍यादी. हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात तेथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवली जाते.
 3. ‘क’ वर्गीय आग (वायुरूपपदार्थ) ः ॲसिटीलीन घरगुती गॅस (एल.पी.जी. गॅस) इत्‍यादी ज्‍वलनशील गॅसमधून लागणारी आग.
 4. ‘ड’ वर्गीय आग (रासायनिक पदार्थ) ः ज्‍वलनशील धातूपासून लागलेली आग यामध्ये पोटॅशिअम, सोडियम व कॅल्शिअम आहेत, हे सामान्‍य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात, तसेच मॅग्‍नेशिअम, ॲल्‍युमिनिअम व झिंक जे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्‍ही गट जेव्‍हा पाण्याशी संयोग पावतात, तेव्‍हा भडका उडतो.
 5. ‘इ’ वर्गीय आग (इलेक्‍ट्रीकल) ः यामध्ये इलेक्‍ट्रीकल सामान, फिटिंग इत्‍यादीं साधनांमुळे लागलेली आग कार्बन डायऑक्‍साइडसारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते.

आग विझविण्याच्या पद्धती ः आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या तीन प्रमुख पद्धती आहेत.

 1. थंड करणे – आग विझविण्यासाठी पाणी हे एक प्रभावी साधन आहे व ते सर्वत्र उपलब्‍ध असते. आगीवर अगर आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्‍यामुळे गारवा निर्माण होतो व पुढे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते.
 2. आगीची कोंडी करणे – आग शमविण्यासाठी व विशेषतः तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझविण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्‍यास त्‍याचा उपयोगही पांघरूण घातल्‍यासारखा होतो. ही आग विझविण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्‍या आगीवर फारच परिणामकारक ठरते.
 3. ज्‍वलनशील पदार्थ हलवणे – या पद्धतीमध्ये प्रत्‍यक्ष ज्‍वलनशील पदार्थच बाजूस करायचे असतात. लाकडी सामान किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्‍तू आगीपासून दूर केल्‍यास आगीचे भक्ष्यच नाहीसे होते. नुकतीच लागलेली आग विझविण्यासाठी स्‍ट्रिरप पंप हे सर्वांत उत्तम साधन आहे. त्‍या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते.

दरड कोसळणे / भूस्खलन (Land-slide)

कठीण पाषाणात नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेल्या भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात. विशेषतः अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा-फटींमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होत राहते, वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे म्हणतात.

दरड कोसळण्याची कारणे

 1. भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम म्हणून दरडी कोसळण्यासारखे प्रकार घडतात.
 2. बेसुमार वृक्षतोडीमुळेही जमिनीची धूप होते.
 3. डोंगराळ/घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड/खडक कोसळतात.

दरड कोसळण्याचे परिणाम

 1. नद्यांना अचानक पूर येतात. नद्यांचे मार्ग बदलतात.
 2. धबधब्याचे स्थानांतरण होते. कृत्रिम जलाशय निर्माण होतात.
 3. दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात. उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात. हे सर्व दगड-मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते.
 4. वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळली की, वाहतूक विस्कळीत होते.
 5. भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते.

आपत्ती निवारण – नियोजन आराखडा ः शाळेच्या आपत्ती निवारणा संदर्भात नियोजन आराखड्याची आपत्ती प्रसंगी मदत कार्य पोहोचण्यास मदत होते. त्यासाठी त्यात खालील गोष्टींची नोंद असणे आवश्यक आहे. खाली एक नमुना तक्ता दिला आहे. त्याप्रमाणे तुम्ही एक तक्ता तयार करा.